Nashik Crime : मोबाईलवर mParivahan.apk नावाची बनावट लिंक पाठवून व्हॉट्सॲप हॅक करत क्रेडिट कार्डमधून तब्बल ६ लाख २८ हजार ६५८ रुपये लंपास करणाऱ्या सायबर भामट्याला नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गोव्यातून अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या तपासानंतर फसवणूक झालेली संपूर्ण ६,२८,६५८ रुपयांची रक्कम फिर्यादीला परत मिळवून देण्यात यश आले आहे.
बनावट APK फाईल पाठवून व्हॉट्सॲप हॅक
मालेगाव येथील रमजानपुरा परिसरातील तक्रारदाराला व्हॉट्सॲपवर mParivahan.apk नावाची लिंक पाठवण्यात आली होती. तक्रारदाराने या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांचे व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले. यानंतर मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेल्या क्रेडिट कार्डमधून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ६,२८,६५८ रुपये परस्पर हस्तांतरित करून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तक्रारदाराने नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक २९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी विविध डिजिटल पुराव्यांच्या आधारे संशयिताचा माग काढत पुष्पेंद्र गणेशकुमार प्रसाद ऊर्फ विहान मल्होत्रा (रा. करकरडुमा, पूर्व दिल्ली) याचा शोध घेतला. पोलिस पथकाने कारवाई करत त्याला हेरिटेज व्हिलेज रिसॉर्ट, दक्षिण गोवा येथून अटक केली. या कारवाईमुळे APK फाईलच्या माध्यमातून सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपीपर्यंत पोलिस पोहोचले आहेत.
Nashik : मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे आठवडी बाजारात भेळभत्त्यासोबत खाल्लेल्या दूषित चटणीमुळे १८६ जणांना विषबाधा झाल्याचे प्राथमिक आरोग्य ...
फसवणुकीची संपूर्ण रक्कम परत
सायबर पोलिसांच्या तपासादरम्यान तक्रारदाराच्या खात्यातून फसवणुकीने हस्तांतरित झालेली ६ लाख २८ हजार ६५८ रुपयांची संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपासात सहभाग घेतला.
नागरिकांनी अनोळखी लिंकपासून सावध रहावे
नाशिक ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे. बँक खात्याची माहिती, OTP, क्रेडिट कार्डची माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना फोनवरून देऊ नये. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अनोळखी व्यक्तीकडून मोबाईलवर आलेली APK फाईल किंवा लिंक डाउनलोड अथवा ओपन करू नये. बँक खात्याशी संबंधित कोणतीही शंका असल्यास थेट संबंधित बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. फसवणूक झाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. ऑनलाइन आर्थिक फसवणुकीसाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण : ०२५३-२२००४०८ / ७६६६३१२११२






