Tuesday, September 29, 2026

Goregaon Film City: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी फिल्मसिटीची जागा ताब्यात, मुंबई महापालिका किती भाडं देणार?

Goregaon Film City: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी फिल्मसिटीची जागा ताब्यात, मुंबई महापालिका किती भाडं देणार?

मुंबई: गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR) दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पामुळे फिल्म सिटीमध्ये अडथळा निर्माण होताना पाहायला मिळत आहे. या प्रकल्पातील तब्बल 1.6 किमीचा रस्ता फिल्म सिटी परिसरातून जात आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्म सिटीमध्ये अनेक शुटिंगचे ग्राऊंड्सचे आहेत. यामुळे वाहतूकदारांना वाहतूकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ज्यामुळे फिल्म सिटी कॉर्पोरेशनने महानगरपालिकेकडे 174.12 कोटी रुपयांपर्यंतच्या आर्थिक नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रकल्पासंबंधित उपाययोजना म्हणून, बीएमसीने इतर मैदानांबरोबरच जोश मैदान आणि जोकर मैदान तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने घेतले असून, मार्च 2029 पर्यंत 20 कोटी रुपये भाडे देणार आहेत.

गोरेगाव - मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटी आणि मुलुंड पश्चिमेतील अमर नगर दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून (एसजीएनपी) जाणाऱ्या दोन तीन-पदरी बोगद्यांचे बांधकाम केले जाणार आहे. प्रकल्प दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी, 45.70 मीटर रुंदीच्या रस्तारेषेला समांतर असलेला 1600 मीटर लांबीचा आणि 10 मीटर रुंदीचा अतिरिक्त जमिनीचा पट्टाही कार्यक्षेत्र म्हणून फिल्मसिटीकडून घेण्यात आलेला आहे. महापालिकेने TBM मशीनचे सुटे भाग आणि बोगद्याच्या खोदकामातून निर्माण होणारा गाळ तात्पुरता साठवण्यासाठी जोश मैदान आणि जोकर मैदान ताब्यात घेतले आहे. बीएमसीच्या प्रस्तावानुसार, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, बीएमसी फिल्म सिटीला प्रति चौरस फूट, प्रति दिन 0.52 रुपये या मंजूर दराने भाडे देईल.

जमिनीचे वार्षिक भाडे 51.30 लाख रुपये, जोश मैदानासाठी 2.44 कोटी रुपये आणि जोकर मैदानासाठी 1.68 कोटी रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच एकूण वार्षिक 4.64 कोटी रुपये किंवा 18 टक्के जीएसटीसह 5.47 कोटी रुपये भाड्यासाठी द्यावे लागणार आहे. जीएमएलआरच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि मुलुंडमधील खिंडीपाडा दरम्यान दुहेरी भुयारी बोगद्यांचे बांधकाम सुरू आहे. प्रत्येक बोगदा 4.70 किमी लांबीचा असून, समांतर भागांमध्ये त्याचा व्यास 14.20 मीटर आणि एसएनजीपीमध्ये 13 मीटर असेल. पहिल्या टीबीएमने आतापर्यंत 64 मीटर उत्खनन करून 27 कायमस्वरूपी आणि दोन तात्पुरत्या रिंग बसवल्या आहेत, तर दुसऱ्या टीबीएमची जुळणी 92 टक्के पूर्ण झाली आहे.

एकदा कार्यान्वित झाल्यावर, 12.20 किमी लांबीचा जीएमएलआर पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवून आणेल, मुंबईच्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करेल आणि पश्चिम उपनगरांना मुलुंड, ठाणे व नवी मुंबईशी जलद गतीने जोडेल अशी अपेक्षा आहे. प्रवासाचा वेळ तब्बल 90 मिनिटांवरून केवळ 20 मिनिटांपर्यंत येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे वाहतुकदारांच्या वेळेमध्ये आणि इंधनामध्ये लक्षणीय बचत होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >