Ghanshyam Darode : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेला छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी घनश्यामने स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. घनश्यामने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो घराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे. आयुष्यातील हा खास क्षण शेअर करताना घनश्याम भावुक झाल्याचंही पाहायला मिळतं.
‘आज काय बोलू ते कळत नाहीये...’
व्हिडिओमध्ये घनश्याम म्हणतो, ‘आज काय बोलू ते कळत नाहीये, डोळ्यांत पाणी येतंय. तुमच्या प्रेमापोटी मी आज इथपर्यंत पोहोचलोय.’ त्याच्या या शब्दांमधून चाहत्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त होत आहे. घनश्यामने या व्हिडिओसोबत एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. अवघ्या २१व्या वर्षी स्वतःच्या मेहनतीने आणि आई-वडिलांकडून एक रुपयाही न घेता पहिलं घर बुक केल्याचं त्याने सांगितलं.
आई-वडिलांच्या त्यागाला दिलं यशाचं श्रेय
घनश्यामने आपल्या पोस्टमध्ये आई-वडिलांचे आभार मानताना त्यांच्या त्यागाचा विशेष उल्लेख केला. हा व्हिडिओ शेअर घनश्यामनं लिहिलं की, ‘आज २१व्या वर्षी स्वतःच्या हिंमतीवर माझं पहिलं घर बुक केलं. आई-बाबांकडून एक रुपयाही न घेता मिळवलेलं हे घर माझ्या मेहनतीचं यश आहे. पण या यशामागची खरी कहाणी माझ्या कष्टांची नाही, तर आई-बाबांनी माझ्यासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागाची आहे. माझ्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या, माझं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली, माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी त्यांनी कित्येकदा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवलं, आज घराच्या चाव्या माझ्या हातात आहेत. पण या घराच्या प्रत्येक विटेत आई-बाबांच्या त्यागाचा एक तुकडा आहे. आई-बाबा…तुम्ही मला आयुष्यभर घर दिलंत, आज तुमच्या संस्कारांनी मी माझं स्वतः चं घर उभं केलं. ही माझी कमाई नाही, ही तुमच्या त्यागाला दिलेली माझी पहिली छोटीशी परतफेड आहे.’
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
घनश्यामच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याच्या मेहनतीचं कौतुक करत नव्या घरासाठी अभिनंदन केलं. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर घनश्याम दरोडेला मोठी लोकप्रियता मिळाली. शोमधून तो घराघरात पोहोचला. सोशल मीडियावर तो कायम सक्रिय असून आपल्या आयुष्यातील विविध अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
घनश्यामला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, त्याने वेळोवेळी या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिलं आहे. आता वयाच्या २१व्या वर्षी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केल्याने घनश्याम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.