मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये वाढणारा स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि मानसिक ताण यांसारख्या समस्या गंभीर बनत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी, यंदाच्या नवरात्रोत्सवात राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा विशेष 9 दिवसांचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.(Chief Minister Health Dialogue)
विद्यार्थ्यांशी थेट संवाद आणि सहभाग
राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर सर्व विद्याशाखांतील विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तरुण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे दूरगामी दुष्परिणाम पुढील आयुष्यात जाणवू शकतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजारच होऊ नयेत यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व या संवादातून पटवून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः आरोग्याबाबत जागृत राहावे आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या कुटुंब, मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' (Lalbuagcha Raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांनी नवसापोटी अर्पण केलेल्या मौल्यवान ...
संवादाचे प्रमुख विषय
या विशेष उपक्रमादरम्यान खालील महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे:
- बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य
- संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी
- व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती
- मानसिक आरोग्य
- मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीन टाइम
- व्यसनांपासून दूर राहणे
- निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती
तज्ज्ञांचे मत
‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा राज्यातील तरुणाईशी थेट संवाद साधणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत तरुणांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांच्याशी थेट संवाद साधणे ही काळाची गरज बनली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित प्रश्न मोकळेपणाने मांडता येणार असून, तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती त्यांना आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.(Chief Minister Health Dialogue)






