तब्बल ५० शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा आयआयटी मुंबई येथे अभ्यास दौरा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि रोबोटिक्सचे शिक्षण देण्यासाठी महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय औद्योगिक संस्था (आयआयटी) मुंबई येथे महानगरपालिकेच्या शाळांतील ५० शिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी २९ सप्टेंबर २०२६ रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा फायदा करून देता येईल, याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे व उद्यमशील बनवने हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.या दौऱ्यामध्ये भारतीय औद्योगिक संस्था (आयआयटी) मुंबई येथील प्रा. डॉ. कवी आर्य आणि प्रा. डॉ. शिवराम कल्याणकृष्णन यांनी आयआयटीच्या महत्त्वाकांक्षी 'ई-यंत्र' प्रकल्पाची शिक्षकांना सविस्तर माहिती दिली.
महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्सुकता, जिद्द आणि उपक्रमशीलता असते, असे गौरवोद्गार प्रा. कवी आर्य यांनी यावेळी काढले. या गुणांचा योग्य उपयोग करून, 'ई-यंत्र'च्या माध्यमातून महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःचा स्टार्ट-अप सुरू करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शिक्षकांना मिळाले रोबोटिक्सचे प्रगत प्रशिक्षण
या अभ्यास दौऱ्यात उपस्थित शिक्षक आणि अधिकाऱ्यांना विविध प्रगत तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ज्यामध्ये रोबोटिक्स प्रोजेक्ट डेमो : ड्रोन , अल्फाबॉट लाईन फॉलोइंग आणि इतर प्रगत रोबोटिक्स प्रकल्पांची माहिती
लॅब-इन-अ-बॉक्स डेमो: शाळांमध्ये सोप्या पद्धतीने अद्ययावत प्रयोगशाळा कशी सुरू करता येईल, याचे थेट मॉडेल शिक्षकांना दाखवण्यात आले. तसेच शिक्षक आणि आयआयटीच्या तज्ज्ञांमध्ये 'ओपन हाऊस' सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनइपी २०२०) महानगरपालिका शाळांमध्ये कसे राबविता येईल तसेच शिक्षण अधिक आनंददायी कसे करता येईल, यावर सखोल चर्चा झाली.
उपक्रमामध्ये सातत्य राहणार
आयआयटी मुंबई आणि महानगरपालिका यांच्यातील या समन्वयामुळे आगामी काळातही रोबोटिक्स आणि कोडिंगचे प्रॅक्टिकल सारखे उपक्रम यापुढे देखील सुरू राहणार आहेत. या माध्यमातून आयआयटी मुंबई मधील प्राध्यापक बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह इतर प्रगत अभ्यासक्रमांची देखील माहिती मिळत राहणार आहे.