मुंबई : भारतीय वायुदलाचे सुपुत्र आणि परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर स्वर्गीय निर्मलजीत सिंह सेखों यांच्या स्मरणार्थ आयोजित 'सेखों इंडियन एअरफोर्स मॅरेथॉन 2026' (Sekhon Indian Air Force Marathon 2026) मध्ये सहभागी होणाऱ्या धावक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना वेळेवर पोहोचता यावे, यासाठी मध्य रेल्वेकडून 3/4 ऑक्टोबर 2026 च्या मध्यरात्री (शनिवार आणि रविवारची मध्यरात्र) दोन विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.
विशेष लोकल गाड्यांचे वेळापत्रक व तपशील:
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या विशेष गाड्या मेन लाईन आणि हार्बर लाईनवर धावणार असून त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
मेन लाईन (कल्याण – सीएसएमटी विशेष): ही विशेष गाडी कल्याण स्थानकावरून मध्यरात्री 02:30 वाजता सुटेल आणि प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे पहाटे 04:00 वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन (पनवेल – सीएसएमटी विशेष): ही विशेष गाडी पनवेल येथून मध्यरात्री 02:40 वाजता निघेल आणि पहाटे 04:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे पोहचेल.
सर्व स्थानकांवर असणार थांबा
विशेष म्हणजे, या दोन्ही विशेष उपनगरीय रेल्वे सेवा त्यांच्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे वाटेतील प्रवाशांनाही या सेवेचा सहज लाभ घेता येणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे धावक, क्रीडाप्रेमी आणि इतर प्रवाशांनी या विशेष सेवेची नोंद घ्यावी आणि मध्य रेल्वेच्या या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Sikhon Indian Air Force Marathon 2026)






