Monday, November 16, 2026

Ravi Dubey Ramayana : "माझा अजूनही विश्वास बसत नाहीये..."; 'रामायण'मधील लक्ष्मणच्या भूमिकेनंतर अभिनेता रवी दुबे भावुक!

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' या भव्य चित्रपटात प्रभू श्रीरामांचे लहान बंधू लक्ष्मण यांची भूमिका साकारणारा अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे भारावून गेला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देत रवीने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनी दिलेल्या अफाट प्रेमाबद्दल त्याने सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

आपल्या भावना व्यक्त करताना रवी दुबेने लिहिले की, "५ नोव्हेंबर २०२६ च्या सकाळी मी जागा झालो आणि मला एक अशी भावना जाणवली, जी मी कधीकाळी विसरून गेलो होतो. मला जाणवलं की लोक माझ्या कामाची दखल घेत आहेत आणि त्यातले प्रेम अफाट आहे. एका कलाकाराला आयुष्यात यापेक्षा वेगळं काय हवं असतं ? कोणीतरी तुमच्या कामाला संधी देणं, तुम्ही ज्या भावनेने काम केलं ती भावना समोरच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांनी स्वतःहून तुम्हाला त्याबद्दल सांगणं, यासारखी दुसरी मोठी भेट नाही. हे लिहितानाही माझा यावर विश्वास बसत नाहीये. आज माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञतेची भावना आहे."

लक्ष्मणच्या भूमिकेबद्दल रवी दुबे काय म्हणाला ?

 
View this post on Instagram
 

A post shared by Ravie Dubey (@ravidubey2312)

आपल्या लक्ष्मणच्या भूमिकेविषयी बोलताना रवीने सांगितले की, प्रभू श्रीराम आणि माता सीतेप्रती असलेली सेवा आणि कर्तव्याची भावना त्याला आपल्या अभिनयातून पडद्यावर आणायची होती. तो पुढे म्हणाला, "श्री लक्ष्मण यांची स्वतःची अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती; प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या एक पाऊल मागे राहून, त्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा सेवेसाठी तत्पर राहण्यातच त्यांना समाधान होते. त्यांचा हा स्वभाव मला खूप सुंदर आणि उदात्त वाटला. मला जेवढं शक्य होतं, तेवढी सेवा आणि कर्तव्याची तीच भावना मला 'रामायण'मध्ये आणायची होती. मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मी माझे सर्वस्व अर्पण करण्याचा प्रयत्न केला. मला फक्त इतकंच हवं होतं, पण प्रेक्षकांनी मला माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम दिले."

दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांचे मानले आभार

या यशाचे श्रेय देताना रवीने चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांचेही विशेष आभार मानले. त्यांच्याबद्दल लिहिताना रवी म्हणाला, "तुम्ही खूप दुर्मिळ आणि चांगली माणसं आहात. जगातील सर्वोत्तम कलाकारांसोबत तुम्ही मला एकाच सेटवर काम करण्याची संधी दिली, यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. त्या सेटवर मी सर्वात नवीन आणि कमी अनुभव असलेला कलाकार होतो, तरीही पहिल्या दिवसापासून तुम्ही मला इतरांइतकाच मान, प्रेम आणि काम करण्याचे स्वातंत्र्य दिले."

सुरुवातीला आपल्या मनात प्रचंड भीती होती, याची कबुलीही रवीने दिली. "ज्यांनी माझ्यावर इतका मोठा विश्वास दाखवला, त्यांची निराशा तर होणार नाही ना? माझ्याकडून काही कमी तर पडणार नाही ना किंवा अति तर होणार नाही ना? माझ्याकडून श्री लक्ष्मण किंवा 'रामायण' या महाकाव्याला कोणताही धक्का तर लागणार नाही ना, अशी भीती मला वाटत होती. पण जेव्हा तुमचं प्रेम मिळालं, तेव्हा मनावरचा ताण हलका झाला. या आनंदात एक प्रकारचा मोठा दिलासा आहे," अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पडद्यामागचे खास फोटो आणि चित्रपटातील तगडी स्टारकास्ट

या पोस्टसोबतच रवी दुबेने 'रामायण'च्या सेटवरील पडद्यामागचे (BTS) काही खास फोटोही शेअर केले आहेत, ज्यातून हा भव्य चित्रपट कसा घडला याची झलक पाहायला मिळते. नमित मल्होत्रा यांचे 'प्राईम फोकस स्टुडिओज', 'डीएनईजी' (DNEG) आणि अभिनेता यशच्या 'मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स' यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच, चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या शेवटी (पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये) सनी देओल यांची भगवान हनुमानाच्या भूमिकेत झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >