Thursday, October 1, 2026

Nashik : नाशिकमध्ये देशातील पहिला पायलट प्रकल्प ! नाशिकच्या ITI विद्यार्थ्यांना रेल्वे ट्रॅक्शन लाईनचे विशेष प्रशिक्षण

Nashik : नाशिकमध्ये देशातील पहिला पायलट प्रकल्प ! नाशिकच्या ITI विद्यार्थ्यांना रेल्वे ट्रॅक्शन लाईनचे विशेष प्रशिक्षण

Nashik : भारतीय रेल्वेच्या वेगाने सुरू असलेल्या विद्युतीकरणामुळे भविष्यात ओव्हरहेड ट्रॅक्शन लाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण होणार आहे. ही गरज लक्षात घेऊन आता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांना ट्रॅक्शन लाईनचे विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशातील या पथदर्शी उपक्रमासाठी नाशिक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे.

२५ केव्ही ट्रॅक्शन लाईनसाठी कुशल तंत्रज्ञ तयार होणार

भारतीय रेल्वेकडून देशभरात विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून, रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात उच्चदाबाच्या ट्रॅक्शन लाईनवर काम करणाऱ्या प्रशिक्षित तंत्रज्ञांची मागणी वाढणार आहे. रेल्वेच्या ट्रॅक्शन लाईनमध्ये तब्बल २५ हजार व्होल्ट (२५ केव्ही) इतक्या उच्चदाबावर काम करावे लागते. त्यामुळे या कामासाठी तांत्रिक कौशल्यासोबतच सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ आवश्यक आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या उपक्रमातून योजनेला मंजुरी

या गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून विशेष कौशल्य प्रशिक्षणाचा प्रस्ताव सादर केला होता. ‘स्किल्ड मॅनपावर डेव्हलपमेंट’ उपक्रमांतर्गत या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर ITI विद्यार्थ्यांना ट्रॅक्शन लाईनसंदर्भातील विशेष प्रशिक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला. यासाठी नाशिकच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिशियन आणि वायरमन विद्यार्थ्यांना २५० तासांचे प्रशिक्षण

या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडमधील विद्यार्थ्यांना २५० तासांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. साधारण अडीच ते तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ITIमधील नियमित शिक्षणासोबत रेल्वे ट्रॅक्शन लाईनच्या कामाचे विशेष कौशल्य आत्मसात करता येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रेल्वेतील तसेच रेल्वे कंत्राटदारांकडील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक कौशल्य प्राप्त होईल. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नाशिक ITI मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार

ट्रॅक्शन लाईनसाठी आवश्यक अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक ITIमध्ये विशेष प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेच्या एकलहरे येथील ‘इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ (आयरीन) या संस्थेच्या सहकार्याने या प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा निधी रेल्वे आणि आयरीनमार्फत उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे उपसंचालक रवींद्र मुंडासे यांनी दिली.

१२ ITI शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू

या पथदर्शी प्रकल्पाची तयारी सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात नाशिक आणि दिंडोरी परिसरातील १२ ITI शिक्षकांची तुकडी एकलहरे येथील आयरीनमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शिक्षकांसाठी एक महिन्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रॅक्शन लाईनसंबंधी प्रशिक्षण देतील. विद्यार्थ्यांची पहिली तुकडी नोव्हेंबर किंवा जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रकल्प यशस्वी झाल्यास देशभर विस्तार

रेल्वेच्या वाढत्या विद्युतीकरणामुळे ट्रॅक्शन लाईनच्या देखभालीसाठी भविष्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. नाशिकमध्ये सुरू होणारा हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची अंमलबजावणी देशातील इतर ITIमध्ये टप्प्याटप्प्याने करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

“रेल्वेच्या वेगाने होणाऱ्या विद्युतीकरणामुळे ट्रॅक्शन लाईनच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना हे विशेष प्रशिक्षण मिळाल्यास त्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नाशिकमधील हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो देशभरात टप्प्याटप्प्याने राबवला जाईल असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण उपसंचालक रवींद्र मुंडासे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >