Malegaon Dongrale Rape And Murder Case : डोंगराळे येथील साडेचार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात जलदगती न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला दोषी ठरवले आहे. अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या आरोपांमध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवले असून, आरोपीला नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाणार, याचा निर्णय ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे.
नेमके काय घडले होते ?
१६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावातून साडेचार वर्षांच्या बालिकेचे अपहरण झाले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप होता. या घटनेनंतर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग देत गावातीलच विजय खैरनार याला काही तासांत अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून अवघ्या तीन आठवड्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती. (Dongrale Rape And Murder Case)
Ashok Kharat Case : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणाऱ्या अशोक खरातच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीय. राज्यभर चर्चेत असलेला भोंदू अशोककुमार खरात ...
२४ साक्षीदारांची साक्ष
या खटल्यात सरकारी पक्षाकडून एकूण २४ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या विरोधात सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने विजय खैरनार याला दोषी ठरवले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीला कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी त्यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली. त्यांना ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. (Dongrale Rape And Murder Case)
शिक्षेचा निर्णय ७ ऑक्टोबरला
आरोपी दोषी ठरल्याने आता त्याला कोणती शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षेवरील युक्तिवाद आणि सुनावणीनंतर ७ ऑक्टोबर रोजी न्यायालय याबाबत निर्णय देणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही न्यायालयात उपस्थिती लावली. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आता ७ ऑक्टोबरच्या सुनावणीत न्यायालय आरोपीला कोणती शिक्षा सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






