Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. विशेष गस्त आणि हाय-अलर्टदरम्यान पोलिसांच्या हाती आंतरराज्यीय गुन्हेगारांची टोळी लागली आहे. दरोडा आणि जबरी चोरीच्या उद्देशाने झारखंडहून नाशिकमध्ये आलेल्या सहा संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी मेळा बसस्थानक परिसरातून अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांकडून तब्बल 3 लाख 32 हजार 500 रुपये किमतीचे नऊ मोबाईल फोन आणि लोखंडी चॉपर जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने सहाही संशयितांना 2 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहराची रेकी करून गुन्ह्याची तयारी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील बसस्थानके, रेल्वे स्थानक आणि बाजारपेठांमध्ये प्रवाशांची आणि भाविकांची गर्दी वाढत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरी आणि दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ही टोळी नाशिकमध्ये दाखल झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, सहाही संशयित दोन दिवसांपूर्वी रेल्वेने नाशिकमध्ये आले होते. शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर त्यांनी गुन्हा करण्याची तयारी सुरू केली होती.
Malegaon Dongrale Rape And Murder Case : डोंगराळे येथील साडेचार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात जलदगती न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला दोषी ठरवले ...
पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना पकडलं
29 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजता मेळा बसस्थानक आणि ठक्कर बाजार परिसरात काही तरुण हत्यारांसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एक आणि सरकारवाडा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी मेळा बसस्थानक परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, गस्तीवर असलेल्या पथकाने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतलं. अंगझडतीदरम्यान संशयितांकडे नऊ मोबाईल फोन आणि लोखंडी चॉपर आढळून आला. यामध्ये सहा मोबाईल संशयितांचे स्वतःचे असून तीन मोबाईल चोरीचे असल्याचं तपासात समोर आलं आहे. या कारवाईमुळे सरकारवाडा, नाशिकरोड आणि पंचवटी या तीन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे सिंहस्थापूर्वी नाशिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळल्याचं समोर आलं आहे.
अटक करण्यात आलेले संशयित
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे अमित हरीलाल महतो, सोहकुमार अरवा महतो, रोशनकुमार नेपाली महतो, सनीकुमार बाडीस महतो, महंमद इतेसार आलम सलीम शेख आणि रोहन अरवा महतो अशी आहेत. हे सर्व झारखंड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरातील संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. याच विशेष गस्तीमुळे ही टोळी गुन्हा करण्यापूर्वीच पोलिसांच्या जाळ्यात अडकली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील पुढील तपास करत आहेत.