Shalarth ID scam : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला नाशिक शहर पोलिसांनी वेग दिला असून, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील संशयित शाळांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. पोलिसांच्या ११ विशेष पथकांनी लॅपटॉप, प्रिंटर आणि कॅमेऱ्यांसह विविध ठिकाणी अचानक भेटी देत कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणात नाशिक विभागात आढळलेल्या ८४१ संशयित शालार्थ आयडींपैकी ६३८ आयडी जळगाव जिल्ह्यातील असल्याचा तपासातील प्राथमिक दावा आहे. त्यामुळे जळगाववर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून, पाच विशेष पथके तेथे कार्यरत असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या या कारवाईदरम्यान संबंधित शाळांमधील मस्टर, जुन्या वेतन बिले, नियुक्तीपत्रे, आवक-जावक रजिस्टर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. बनावट कागदपत्रांची निर्मिती आणि वापर यासंदर्भातील डिजिटल पुरावे मिळविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही तपासणी केली जात आहे.
मार्च २०२५ मध्ये गुन्हा दाखल
या प्रकरणी मार्च २०२५ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात अनेक अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि संस्थाचालकांचा संशयित म्हणून समावेश असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांच्या तपासात आतापर्यंत १,२०० हून अधिक संशयितांची नावे तपासात समोर आल्याची माहिती आहे.
Nashik-Delhi flight service : नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. ओझर येथील नाशिक विमानतळावरून नवी दिल्लीसाठी सकाळची थेट ...
१२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष पथक
या तपासासाठी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके आणि सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व अंमलदारांची विशेष पथके कार्यरत आहेत. सुमारे ४६ अधिकारी आणि ८० हून अधिक पोलिस कर्मचारी तपास आणि कारवाईत सहभागी असल्याचे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत आठ जणांना अटक
या प्रकरणात माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्यासह संजय गरूड, दीपक गरूड, शशिकांत हिंगोणेकर, तुषार साळुंके, किरण पाटील, राहुल पवार आणि प्रशांत वाडीले या आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासाचा विस्तार आता शिक्षण विभागातील अधिकारी, संबंधित संस्था आणि इतर व्यक्तींपर्यंत होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येतात आणि पोलिसांच्या तपासातून कोणते पुरावे हाती लागतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासातील आरोप अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असून, संबंधित व्यक्तींवरील दोष सिद्ध होईपर्यंत त्यांना कायद्यानुसार निर्दोष मानले जाते.