जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर पुन्हा चर्चा होणार
मुंबई : विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील निर्माण झालेला जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांनी या जागेवर दावा केल्याने अंतिम निर्णय झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ६ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असल्याने पुणे शिक्षक मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, याबाबत वरिष्ठ पातळीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा परंपरेने भाजपकडे असल्याचा दावा पक्षाकडून केला जात असला, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेसाठी तयारी सुरू केली आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा भाजपने लढवाव्यात, अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच मांडली होती. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर होणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावी, अशी मागणी पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. माजी आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, निलेश निकम, दीपक मानकर आणि सुभाष जगताप यांनी शुक्रवारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची जिजाई निवासस्थानी भेट घेतली. पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने ती पक्षानेच लढवावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेत सध्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपकडे, तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची चर्चा आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी पुणे शिक्षक मतदारसंघावर तिन्ही पक्षांचा दावा कायम असल्याने या जागेचा निर्णय अद्याप झालेला नाही. अमरावती शिक्षक मतदारसंघातही महायुतीतील उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.
मुंबई : मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील तपास आणि दिशा सालियन प्रकरणातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लूक ...
महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद
- दुसरीकडे, महाविकास आघाडीतही जागावाटपावरून मतभेद आहेत. काँग्रेसने मित्रपक्षांशी चर्चा न करता तीन उमेदवारांची नावे जाहीर केल्याने आघाडीतील इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरे यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे.
- काँग्रेसच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीची दुसरी बैठक शनिवारी दुपारी दोन वाजता हयात हॉटेल येथे होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि उबाठा गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
- दरम्यान, विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. पुणे, नागपूर आणि संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून २३ ऑक्टोबरला सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे. २७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.





