Saturday, October 3, 2026

Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! वलसाड–दानापूर विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ, खान्देशातील 'या' तीन स्थानकांवर थांबा

Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! वलसाड–दानापूर विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ, खान्देशातील 'या' तीन स्थानकांवर थांबा

Valsad–Danapur Special Train :  प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वे प्रशासनाने वलसाड–दानापूर विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गुजरात, खान्देश आणि बिहारदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, खान्देशातील महत्त्वाचे जंक्शन असलेल्या जळगाव स्थानकावर या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही.

गाडी क्रमांक 09025 वलसाड–दानापूर विशेष रेल्वे आता 5 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. ही गाडी दर सोमवारी सकाळी 8.40 वाजता वलसाडहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता दानापूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 09026 दानापूर–वलसाड विशेष रेल्वेच्या फेऱ्यांनाही 6 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर मंगळवारी दुपारी 1.30 वाजता दानापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता वलसाड येथे पोहोचेल.

खान्देशातील तीन स्थानकांवर थांबा

वलसाडहून दानापूरकडे जाताना ही विशेष रेल्वे भेस्तान, नंदुरबार, धरणगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी यांसह विविध स्थानकांवर थांबते. खान्देशातील नंदुरबार, धरणगाव आणि भुसावळ या तीन स्थानकांवर गाडीला दोन्ही दिशांनी थांबा आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना गुजरात तसेच मध्य प्रदेश आणि बिहारच्या दिशेने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे पर्याय उपलब्ध झाला आहे.

जळगावला थांबा नसल्याने प्रवाशांची अडचण

एकीकडे खान्देशातील तीन प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला असला, तरी जळगाव स्थानकावर मात्र थांबा नसल्याने जळगावकर प्रवाशांची निराशा होणार आहे. विशेषतः नंदुरबार किंवा इतर स्थानकांवरून या गाडीतून प्रवास करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना जळगाव येथे उतरता येणार नाही. सणासुदीच्या काळात गुजरात आणि बिहारच्या दिशेने प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता या विशेष रेल्वेच्या वाढीव फेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आरक्षणाला सुरुवात

वाढीव फेऱ्यांसाठीचे आरक्षण शनिवारपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांवर तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करता येणार आहे. विशेष रेल्वे असल्याने या गाडीला नियमानुसार विशेष भाडे लागू राहणार आहे. आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासादरम्यान वैध ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.गाडीचे थांबे, आगमन-प्रस्थानाच्या वेळा आणि डब्यांची संरचना यासंबंधीची अद्ययावत माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक आणि आरक्षणाची उपलब्धता तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >