Monday, October 5, 2026

Nashik Crime : धर्मांतराच्या दबावासह लैंगिक शोषणाचा आरोप, नाशिकमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल

Nashik Crime : धर्मांतराच्या दबावासह लैंगिक शोषणाचा आरोप, नाशिकमध्ये नव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल

Nashik Crime : महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत नाशिक शहरात पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police Station) हद्दीत एका तरुणीचे अल्पवयीन असल्यापासून लैंगिक शोषण केल्याचा, अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा तसेच लग्नासाठी धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अमन अफसर खान याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावरून झाली ओळख

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२१ मध्ये ती अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरोपी तिच्या नियमित संपर्कात राहू लागला आणि दोघांच्या भेटीगाठीही वाढल्या. याच काळात पीडितेच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली असताना आरोपीने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अल्पवयीन असताना अत्याचाराचा आरोप

पीडितेच्या तक्रारीनुसार, ती १६ वर्षांची असताना आरोपीने तिला नाशिकमधील एका लॉजवर नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही लग्नाचे आश्वासन देत आरोपीने तिचे शोषण सुरू ठेवल्याचा आरोप आहे. 'मी तुला सोडणार नाही, तुला पत्नी मानले आहे,' असे सांगून आरोपीने तिचा विश्वास संपादन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नासाठी धर्मांतराची अट ?

पीडिता १८ वर्षांची झाल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, लग्न करायचे असल्यास तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी धर्मांतर करावे लागेल, अशी अट आरोपीने घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर पीडितेवर विशिष्ट पद्धतीने राहण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली आणि परपुरुषांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

अश्लील फोटो-व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

पीडितेने आरोपीवर अश्लील फोटो आणि व्हिडिओचा वापर करून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप केला आहे. या माध्यमातून तिच्यावर दबाव कायम ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी अमन अफसर खान याच्याविरोधात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा