Nashik (Malegaon) : मेंढ्या धुण्यासाठी पाझर तलावात उतरलेल्या तीन मेंढपाळांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी मालेगाव तालुक्यातील कजवाडे शिवारात घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांची नावे बाबू गुठा गोयेकर (५५), हरी बाबू गोयेकर (२७) आणि भूषण राघो कन्नोर (१२) अशी आहेत. हरी हा बाबू गोयेकर यांचा मुलगा, तर भूषण हा त्यांच्या भाचीचा मुलगा होता.
मुलाला वाचवताना मामा - आजोबाचाही दुर्दैवी अंत
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास तिघेही कजवाडे शिवारातील पाझर तलावावर मेंढ्या धुण्यासाठी गेले होते. यावेळी भूषण पाण्यात बुडू लागला. त्याला बुडताना पाहून हरीने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हरीही बुडू लागला. मुलगा आणि नातू दोघेही पाण्यात बुडताना पाहून बाबू गोयेकर यांनीही त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, तिघांनाही खोल पाण्यातून बाहेर पडता आले नाही. अखेर तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
Nashik : पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून ...
मुलांचा आक्रोश ऐकून मदतीसाठी धाव
तिघेही डोळ्यांदेखत पाण्यात बुडाल्यानंतर तलावाच्या काठावर असलेल्या लहान मुलांनी आरडाओरड सुरू केली. मुलांचा आक्रोश ऐकून जवळच असलेल्या काही आदिवासी महिला घटनास्थळी धावून आल्या. मुलांकडून घटनेची माहिती मिळताच महिलांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. गावकऱ्यांनी तातडीने तलावात उतरून शोधमोहीम राबवली आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर मृतदेह मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा दुर्दैवी अंत
या घटनेत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांतील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने गोयेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेमुळे कजवाडे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






