Nashik TCS Case : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणी आणि तरुणाच्या धर्मांतर प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलेल्या निदा एजाज खान हिच्यासमोर आता वैवाहिक आयुष्यातील नवे संकट उभे राहिले आहे. न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात असलेल्या निदा खानविरोधात तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने निदाला समन्स बजावले असून, 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे समजते. निदा खान सध्या आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे. दरम्यान, तिच्या वैवाहिक जीवनातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
दोन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
निदा खानसह इतर काही संशयितांविरोधात नाशिकमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) एका बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणीच्या तक्रारीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) याच कंपनीतील एका तरुणाच्या तक्रारीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन यांच्यासह निदा खान हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये नाशिकरोड तसेच नाशिक जिल्हा न्यायालयाकडून (Nashik District Court) निदा खानला सशर्त जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे.
Nashik (Malegaon) : मेंढ्या धुण्यासाठी पाझर तलावात उतरलेल्या तीन मेंढपाळांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी ...
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान वैवाहिक वाद
मार्च महिन्यापासून या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर निदा खानला (Nida Khan) पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. याच काळात तिच्या वैवाहिक जीवनातही तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. निदाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव आणि कौटुंबिक मतभेद यामुळे तिच्या पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, घटस्फोटाच्या अर्जातील नेमकी कारणे आणि त्यावरील न्यायालयीन भूमिका पुढील सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे.
जामिनाच्या सुनावणीवेळी न्यायालयाची बाळाच्या हिताबाबत भूमिका
यापूर्वी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने तिच्या गर्भावस्थेचा आणि होणाऱ्या बाळाच्या हिताचा विचार केला होता. बाळाचे हित आणि मानवी हक्क महत्त्वाचे असल्याचे नमूद करत न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत आधुनिक समाजात निष्पाप नवजात बाळाला तुरुंगातील वातावरणाचा सामना करावा लागू नये, अशी भूमिका मांडली होती. निदाला जामीन मिळाल्यानंतर आता तिच्या वैवाहिक आयुष्यातील वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे गर्भावस्था, सुरू असलेली न्यायालयीन प्रक्रिया आणि कौटुंबिक वाद या तिन्ही बाबी एकाच वेळी समोर आल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.





