Nashik Crime : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली. बर्डीपाडा गावाजवळील हॉटेलच्या परिसरात सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगारावर छापा टाकत पोलिसांनी १६ संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि तब्बल १० आलिशान चारचाकी वाहनांसह सुमारे ७३ लाख २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. गुजरात सीमेलगत असलेल्या बर्डीपाडा येथील हॉटेल एन.जी. हिल्सच्या मोकळ्या जागेत तीन पत्तीचा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे, सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, सहायक निरीक्षक गायत्री जाधव, दीपक निगळ तसेच पोलीस कर्मचारी प्रितम लोखंडे, माधव साळे, पारखे, बोडके आणि महिला अमलदार गायकवाड यांच्या पथकाने रविवारी (दि. ४) पहाटे सुमारे पावणेचारच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
गुजरातमधील व्यावसायिक आणि लँडलॉर्ड पोलिसांच्या ताब्यात
कारवाईदरम्यान सुरत, वलसाड, नवसारी तसेच दादरा-नगर हवेली परिसरातील सिल्वासा येथील काही व्यावसायिक आणि जमीन व्यवहाराशी संबंधित व्यक्ती जुगार खेळताना आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, यामध्ये मोठ्या आर्थिक उलाढालीशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व १६ संशयितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर करीत आहेत.
पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कथित जुगार अड्डा चालविणारा श्याम नागू पवार (वय ३९, रा. दवाखानापाडा, सुरगाणा) याने पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करून गोंधळ घातल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध जुगार कायद्यासोबतच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik : देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी (TCS) संबंधित गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणाची ...
कारवाईतील १६ संशयित
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात श्याम नागू पवार (सुरगाणा), विजयभाई चंदुभाई उकाळे, जिग्नेशभाई पुरुषोत्तमभाई सावलिया, केशव बाबूलाल वसावा, गुलाम मोहिउद्दीन अब्दुल मन्सुरी, हितेश सुरेशभाई पटेल, साहिब मेहबूब शेख, अब्दुल जुबेर रफिक शेख, मुश्ताक शेख रफोद्दीन आणि आरिफ शकील शेख (सुरत) यांच्यासह वलसाड, नवसारी आणि सिल्वासा परिसरातील इतर सहा जणांचा समावेश आहे.
७३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला
- रोख रक्कम : २ लाख ३ हजार ८७० रुपये
- महागडे मोबाईल फोन : सुमारे १ लाख ९८ हजार ५०० रुपये
- १० आलिशान चारचाकी वाहने : सुमारे ६९ लाख रुपये
- एकूण जप्त मुद्देमाल : सुमारे ७३ लाख २ हजार ३७० रुपये
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या जुगाराच्या ठिकाणामागील आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.