
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक लवकरच राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या पाहणीनंतर केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाणार असून, शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या प्रक्रियेला यामुळे वेग येण्याची शक्यता आहे.
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे अंतरिम अहवाल पाठवून NDRF अंतर्गत मदतीचा प्रस्ताव दिला आहे. तसेच दिल्ली येथे झालेल्या रबी हंगामाच्या बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या अडचणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यावेळी महाराष्ट्रात केंद्राचे पथक पाठवण्याची मागणी करण्यात आली होती.
वाशिम: महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत जलाशय आणि तलावातील पाणीसाठा कमी असल्यामुळे मत्स्य व्यवसायापुढे संकट निर्माण झाले ...
केंद्राकडून स्थापन करण्यात आलेल्या या पथकाचे अध्यक्ष कृषी व किसान कल्याण विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल असणार आहेत. पथकामध्ये केंद्र सरकारच्या विविध 10 विभागांतील अधिकारी सहभागी होणार आहेत. यामध्ये वित्त, कृषी, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, ग्रामविकास, जलशक्ती तसेच नीती आयोगासह संबंधित विभागांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या समन्वयाने हे पथक दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2020 नुसार परिस्थितीचे मूल्यांकन करून केंद्राला अहवाल दिला जाईल. तसेच NDRF आणि SDRF अंतर्गत मदत, आवश्यक उपाययोजना आणि पुढील पुनर्वसनाबाबत शिफारशी केल्या जाणार आहेत.
राज्य सरकारच्या 26 सप्टेंबर 2026 रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. केंद्राचे पथक प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याने दुष्काळग्रस्त भागांना मदत मिळण्याच्या प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





