नाशिक : “देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखा सक्षम नेता मिळणे हे आपले भाग्य आहे. मोदी यांनी कधीही सुट्टी घेतली नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित देशाच्या दिशेने वाटचाल करीत असून, आयातदार देश अशी ओळख असलेल्या भारताने आता निर्यातदार देश म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री महाजन यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन टर्म गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करीत असून, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता, युवक आणि विद्यार्थ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीतही भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे. देशाचा एक जवान शहीद झाला तर त्याचा बदला घेण्याची क्षमता भारतात आहे. जगातील क्रमांक एकचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जात असल्याचे महाजन यांनी सांगितले. विरोधकांकडून कितीही टीका झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करून देशहितासाठी काम करण्याची गरज आहे. देश स्वातंत्र्याचा शंभरावा वर्धापनदिन साजरा करेल, तेव्हा भारत आत्मनिर्भर देश म्हणून उभा राहिलेला असावा, यासाठी आजपासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देश आणि पक्ष यानंतर आपण स्वतःच्या पातळीवरही राष्ट्रहितासाठी काम करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करणे हे आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. नाशिककर म्हणून ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित व अखंडित ...
भारताला विश्वगुरू बनविण्याचा संकल्प
“आपला देश शंभर वर्षांचा वर्धापनदिन साजरा करेल, तेव्हा भारत आत्मनिर्भर म्हणून उभा राहिला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी आणि सामान्य जनतेच्या विकासासाठी सर्वांनी योगदान द्यावे. आपण कोणत्याही क्षेत्रात कमी राहणार नाही. विकसित भारतासोबतच नाशिकचा सिंहस्थ कुंभही यशस्वी करण्याची जबाबदारी आपली आहे,” असे गिरीश महाजन यांनी सांगितले.