Nashik : गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा आणि अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. निर्मला लोंढे असे संशयित महिलेचे नाव असून, तिच्याकडून तब्बल 7 लाख 12 हजार 344 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
बसमध्ये चढताना प्रवाशांना बनवायची शिकार
नाशिक शहरातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातील रोख रक्कम, अंगावरील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात एखादी टोळी सक्रिय आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा युनिट-1 ला याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरातील विविध बसस्थानकांवर गस्त वाढवली.
पोलिसांनी सापळा रचून महिलेला पकडले
दरम्यान, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ आणि राम बर्डे यांना निर्मला लोंढे ही महिला गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी आणि इतर मौल्यवान वस्तू चोरी करण्यासाठी मेळा बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. निर्मला लोंढे ही संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित व अखंडित ...
51.79 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
पोलिसांच्या चौकशीत निर्मला लोंढे हिने शहापूर ते साक्री या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांकडील मौल्यवान वस्तू चोरी केल्याची कबुली दिल्याचे समोर आले. तिच्याकडून सोन्याची साखळी, मंगळसूत्र, हिऱ्यांनी सजवलेले सोन्याचे कानातले, नऊ खडे असलेले सोन्याचे पदक आणि सोन्याचा वेढा असे एकूण 51.79 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 7 लाख 12 हजार 344 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पतीवर 20 हून अधिक गुन्हे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित निर्मला लोंढे हिचा पती विजय लोंढे याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असून निर्मला हिचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे.
गर्दीतील संशयित हालचालींवर पोलिसांची नजर
बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी सातत्याने संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या गुप्त माहितीतून निर्मला लोंढे हिच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.- संदीप मिटके, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा