Wednesday, October 7, 2026

Palghar Gas Leakage : पालघरमध्ये हायड्रोजन गॅसची गळती! मुंबई-गुजरात महामार्गावर १२ तासांचे थरारक आपत्कालीन ऑपरेशन

मंगळवारी सायंकाळी सुरू झालेले हायड्रोजन गळतीचे हे संकट तब्बल १२ तासांच्या अथक आणि आव्हानात्मक बचाव मोहिमेनंतर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आले. सुदैवाने, वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसर सुरक्षित घोषित करण्यात आला आहे.

१३ सिलिंडरची गळती रोखली, १६० सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवले

मुंबई : मुंबई-गुजरात (Mumbai-Gujrat Expressway) महामार्गावरील पालघर जिल्हा हद्दीत हायड्रोजन वायूने भरलेल्या सिलिंडर्समधून अचानक गळती सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी सुरू झालेले हायड्रोजन गळतीचे हे संकट तब्बल १२ तासांच्या अथक आणि आव्हानात्मक बचाव मोहिमेनंतर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आले. सुदैवाने, वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसर सुरक्षित घोषित करण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी घटना, मदतीसाठी रासायनिक तज्ज्ञ दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास महामार्गावर हायड्रोजन वायूची गळती सुरू झाल्याची घटना निदर्शनास आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने महामार्गावरील अपघातग्रस्त वाहनांना मदत करणाऱ्या 'हेल्प फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेशी संलग्न असलेले रासायनिक तज्ज्ञ धनंजय गीड यांच्या नेतृत्वाखालील पथकाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

१३ सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून गळती; १६० सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवले

आपत्कालीन मोहिमेदरम्यान पथकाला हायड्रोजनने भरलेल्या १३ सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून (Valves) वायूची गळती होत असल्याचे आढळून आले. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने कोणताही धोका न पत्करता गळती होत असलेले हे १३ सिलिंडर अत्यंत खबरदारीने एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच, संभाव्य धोका टाळण्यासाठी सोबत असलेले इतर सुमारे १६० सिलिंडर घटनेच्या ठिकाणापासून दूर एका मोकळ्या शेतात हलवण्यात आले. तपासणीअंती हे उर्वरित सर्व सिलिंडर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

रात्रभर चालले बचावकार्य, सकाळी परिसर सुरक्षित घोषित

हायड्रोजन वायूची गळती रोखणे आणि सर्व सिलिंडर्स सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम रात्रभर सुरू होते. तज्ज्ञ आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बुधवारी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास हे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले आणि संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित करण्यात आला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे महामार्गावरील वाहतूक आणि स्थानिक नागरिकांवरील मोठा धोका टळला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >