Sunday, November 22, 2026

Powai Lake : पवई तलावावर 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती पाहता येणार

बिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी या ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन करण्यात आले. पहिला शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मुंबई : मुंबईतील पवई तलावाच्या सौंदर्यात आता अत्याधुनिक म्युझिकल फाउंटनची भर पडली आहे. 180 मीटर लांबीच्या या आकर्षक फाउंटनमध्ये संगीत, प्रकाश आणि ध्वनीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी या ‘लाईट, साउंड आणि म्युझिकल फाउंटन शो’चे उद्घाटन करण्यात आले. पहिला शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आधुनिक तंत्रज्ञानातून पाहता येणार

पवई तलाव येथील गणेश घाटावर हा फाउंटन उभारण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास, महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती आणि मुंबईची गौरवशाली गाथा सादर केली जाणार आहे. या प्रकल्पात संगीतमय कारंजे, वॉटर स्क्रीन आणि फायर जेट्स यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. मल्टिमीडिया तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तीन वेगवेगळे चित्रपट दाखवले जाणार असून, प्रकाश आणि ध्वनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना इतिहासाचा अनुभव घेता येणार आहे.

पवई तलावाच्या स्वच्छतेवरही भर

उद्घाटनप्रसंगी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. या फाउंटनमुळे मुंबईच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासोबतच त्याच्या स्वच्छतेवरही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दररोज 30 लाख लिटर पाण्यात होणार एरेशन

या फाउंटनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्याचे एरेशन अर्थात हवामिश्रण. या प्रक्रियेमुळे दररोज सुमारे 30 लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागू शकतो. तसेच बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या उद्घाटनावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडा आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञान, मनोरंजन आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा संगम असलेला हा म्युझिकल फाउंटन मुंबईतील पर्यटनाचे नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >