
भारतीय पुरुष हॉकी संघाने यजमान न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची ऐतिहासिक 'भारत-न्यूझीलंड शताब्दी क्रीडा ऐक्य' मालिका 1-0 अशी खिशात घातली आहे. ऑकलंडमधील लॉईड एल्स्मोर हॉकी स्टेडियमवर रंगलेला मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला आणि 2-2 अशा बरोबरीत सुटला. पहिल्या सामन्यातील विजयाच्या जोरावर भारताने मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले.अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात करत नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने पहिला गोल नोंदवला. डायलन थॉमसने हा गोल करत कीवी संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र भारतीय संघाने या धक्क्यातून सावरत अवघ्या काही मिनिटांतच जोरदार मुसंडी मारली. 16 व्या मिनिटाला कर्णधार संजय राणाने गोल करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर अवघ्या दोनच मिनिटांनी, म्हणजेच 18व्या मिनिटाला सेल्वम कार्थीने शानदार मैदानी गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय बचावफळीने न्यूझीलंडचे सर्व हल्ले परतवून लावत आपली आघाडी भक्कम ठेवली होती. मात्र, सामना संपायला केवळ पाच मिनिटे शिल्लक असताना 55 व्या मिनिटाला बेंजी कल्हेनने गोल करत न्यूझीलंडला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. अखेरच्या मिनिटांत दोन्ही संघांनी विजयी गोलसाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, या मालिकेत भारताने पहिला सामना 3-2 ने जिंकला होता, तर दुसरा आणि तिसरा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे ही मालिका भारताने 1-0 ने आपल्या खिशात घातली.
[caption id="attachment_1077884" align="aligncenter" width="800"] इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर आपल्या आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखवणाऱ्या पंतने न्यूझीलंडमध्येही खळबळ उडवून दिली ...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांच्या शतकपूर्तीनिमित्त या विशेष मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त या मालिकेचे अधिकृत नाव '2026 भारत-न्यूझीलंड शताब्दी क्रीडा ऐक्य स्पर्धा' असे ठेवण्यात आले होते. बरोबर 100 वर्षांपूर्वी, 1926 मध्ये मेजर ध्यानचंद यांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या हॉकी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. न्यूझीलंडचा दौरा करणारा तो भारताचा पहिलाच संघ होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ही मालिका खेळवण्यात आली.





