मुंबई : खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे ११ सदस्यांचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून, गुरुवारपासून प्रत्यक्ष क्षेत्रभेटींना सुरुवात झाली आहे. दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि अन्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्याचे मूल्यांकन पथकाकडून करण्यात येणार आहे.
कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग यांसह संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे. कृषी व शेतकरी कल्याण विभागातील पीक विमा विषयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल हे पथकाचे नेतृत्व करीत आहेत. क्षेत्रभेटीसाठी केंद्रीय पथकाचे तीन गट करण्यात आले आहेत. पहिल्या पथकाकडून अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. दुसरे पथक छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत जाऊन पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईचा आढावा घेणार आहे. तिसरे पथक नागपूर, यवतमाळ तसेच लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.
मुंबई : दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये आता अन्नधान्याच्या उपलब्धतेवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. दुष्काळामुळे ...
प्रत्यक्ष क्षेत्रभेटीदरम्यान दुष्काळाची तीव्रता, पिकांचे झालेले नुकसान आणि पाणीटंचाईची स्थिती याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय साधून ही पाहणी केली जाणार आहे. जिल्हानिहाय अंतिम कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर पथकाच्या क्षेत्रभेटींचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीतील निष्कर्षांमुळे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय वास्तव केंद्र सरकारसमोर अधिक ठळकपणे मांडण्यास मदत होणार आहे.