Thursday, October 8, 2026

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी १२ ऑक्टोबर शेवटची संधी

१२ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ), बीएलओ किंवा निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष अर्ज जमा करता येतील. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

मुंबई : राज्यातील एकही पात्र नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, तसेच अपात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत राहू नयेत, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष मोहिमा आणि शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादीतील दावे आणि हरकतींची प्रक्रिया सुरू असताना नवमतदारांच्या नोंदणीसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पात्र नागरिकांना १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

युवा मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचा अर्ज भरण्यास मदत करत आहेत. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जात आहे.

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांची बीएलओकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. पात्रता निश्चित झाल्यानंतर संबंधित नागरिकांकडून नमुना क्रमांक ६ भरून घेतला जात आहे. गृहभेटीदरम्यान घरी उपलब्ध नसलेल्या नागरिकांसाठी १० आणि ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

स्थानांतरित किंवा अनुपस्थित मतदारांच्या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा मतदारांनाही नवीन पत्ता नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे स्थलांतरामुळे मतदार यादीत नाव किंवा पत्ता अद्ययावत नसलेल्या नागरिकांनीही या प्रक्रियेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१२ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ), बीएलओ किंवा निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष अर्ज जमा करता येतील. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून किंवा ‘ईसीआयनेट’ मोबाइल अ‍ॅपद्वारे अर्ज सादर करता येणार आहेत.

आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झालेल्या अर्जांची नियमांनुसार छाननी करून पात्र नागरिकांचा मतदार यादीत समावेश केला जाईल, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी नोंदणी तसेच मतदार यादीतील तपशील दुरुस्तीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >