Saturday, November 21, 2026

Pune Camp 8 hotels license suspended : पुणेकरांनो सावधान! बाहेर खाताय ? कॅम्पमधील ८ प्रसिद्ध हॉटेल्सवर FDA ची मोठी कारवाई!

याच मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवारी (ता. २०) कॅम्प आणि एम. जी. रोड परिसरात एफडीएच्या पथकाने अचानक छापेमारी करत तब्बल २० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वच्छतेचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे उघड झाल्याने आठ हॉटेल्सचे परवाने जागीच निलंबित करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुणे : पुणे शहरातील खवय्यांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि महापालिकेने कंबर कसली आहे. सध्या शहरभरातील प्रसिद्ध खाऊगल्ल्या आणि हॉटेल्सवर प्रशासन करडी नजर ठेवून असून, अतिक्रमण व अस्वच्छतेविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवारी (ता. २०) कॅम्प आणि एम. जी. रोड परिसरात एफडीएच्या पथकाने अचानक छापेमारी करत तब्बल २० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वच्छतेचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे उघड झाल्याने आठ हॉटेल्सचे परवाने जागीच निलंबित करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

या आठ आस्थापनांवर कोसळली कारवाईची कुऱ्हाड

राज्य शासनाच्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई पार पडली. तपासणीअंती नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ज्या आठ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. पुणे स्टेशन परिसरातील मेट्रो रेस्टॉरंट आणि शिवाय कॉर्नर. कॅम्प व ईस्ट स्ट्रीटरोड वरील ग्रँड दिल्ली दरबार, राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार आणि सहाना व्हेज रेस्टॉरंट, एम. जी. रोडवरील द बर्गर बार्न कॅफे आणि इतर परिसरामधील ससाणेनगरमधील महादेव फूड्स आणि कोंढवा खुर्द येथील फिरोज केटरर्स या ठिकाणांचा समावेश आहे.

स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि घातक रंगांचा वापर

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांची पाहणी केली, तेव्हा तिथे अत्यंत किळसवाणी आणि अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कीटकांचा वावर असल्याचे दिसून आले, जे ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. याशिवाय, तपासणी केलेल्यांपैकी सात हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थांना आकर्षक बनवण्यासाठी कृत्रिम रंगांचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले. तर, 'मेट्रो रेस्टॉरंट'मध्ये कृत्रिम रंगांसोबतच 'एमएसजी' (MSG - अजिनोमोटो) या घटकाचा मर्यादेपेक्षा जास्त वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तात्काळ कारवाई करत यांचे परवाने निलंबित केले.

नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची गय नाही: प्रशासनाचा इशारा

अन्न विभागाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, प्रिया राजगोळकर, दीपाली घोडके आणि पूजा बागडे यांचा समावेश होता. या कारवाईनंतर बोलताना सह आयुक्त करकळे यांनी हॉटेल व्यावसायिकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनाची गय केली जाणार नाही; स्वच्छता व अन्न साठवणुकीचे निकष न पाळल्यास थेट परवाने निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >