
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून प्रक्रिया न करता दूषित सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी. गरज भासल्यास संबंधित कंपन्या बंद करण्याची कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या दत्तनगर, मारुती संकुल आणि तुळजाभवानी परिसरातील कुपनलिकांमधून पिवळ्या रंगाचे, उग्र वासाचे आणि रसायनमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही कंपन्यांकडून प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी जमिनीत सोडले जात असल्याचा आरोप आहे. हे दूषित पाणी जमिनीखालील जलस्रोतांद्वारे नंदिनी नदीत मिसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्र्यांकडून घटनास्थळी पाहणी
या गंभीर प्रश्नाची दखल घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी दत्तनगर, मारुती संकुल आणि तुळजाभवानी परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कुपनलिकांमधील दूषित पाण्याची पाहणी करत त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना त्वचेच्या तक्रारी आणि इतर आरोग्यविषयक त्रास होत असल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत महाजन यांनी चिंता व्यक्त केली.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची ...
"नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही"
नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. निष्काळजीपणा करणाऱ्या उद्योगांना पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा गिरीश महाजन यांनी दिला. दूषित पाण्याचा वापर होऊ नये यासाठी प्रभावित भागातील हातपंप आणि कुपनलिका तातडीने सील करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच महापालिकेने स्थानिक नागरिकांना मुबलक आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही आदेश देण्यात आले.
उद्योग आणि पर्यावरण विभागाला तातडीने चौकशीचे आदेश
अंबड परिसरातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी मंत्री महाजन यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच संबंधित विभागांच्या सचिवांशीही चर्चा करून अंबड परिसरातील जलप्रदूषणाची वस्तुस्थिती तातडीने तपासावी आणि दोषी आढळणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश दिले.
सीईटीपी प्रकल्पाच्या संथ कामावरही नाराजी
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (CETP) कामाचीही पालकमंत्री महाजन यांनी पाहणी केली. या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना खडसावले. प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या औद्योगिक सांडपाण्याचा परिणाम पुढे नंदिनी आणि गोदावरी नदीवर होण्याची शक्यता आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना सीईटीपी प्रकल्प रखडणे सहन केले जाणार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. निश्चित कालमर्यादेत प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी संबंधित ठेकेदाराला दिला.
Nana Patekar's special bond with Nashik : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने कला आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात ...
जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
अंबड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक पाण्याचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. कुपनलिकांमधून येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याबरोबरच नंदिनी आणि गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा धोका निर्माण झाल्याची चिंता पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती. आता पालकमंत्र्यांनी थेट घटनास्थळी पाहणी करून कठोर कारवाईचे आदेश दिल्याने अंबडमधील जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर पुढील काळात काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पाहणीवेळी अधिकारी उपस्थित
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाहणीवेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह उद्योग आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





