
Nana Patekar's special bond with Nashik : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने कला आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. नाना पाटेकर यांचे अनेक शहरांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यापैकी नाशिकशी असलेले त्यांचे नातेही विशेष होते. तीर्थक्षेत्र आणि द्राक्षनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकला साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक चळवळींचीही समृद्ध परंपरा लाभली आहे. याच सांस्कृतिक वातावरणाशी नाना पाटेकर यांचे विविध माध्यमांतून नाते जोडले गेले.
‘प्रतिघात’च्या चित्रीकरणातून नाशिकशी जुळला संबंध
नाना पाटेकर यांच्या नाशिकशी असलेल्या संबंधाची सुरुवात त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतच झाली. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील ‘प्रतिघात’ या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले होते. या निमित्ताने नाशिककरांना नाना पाटेकर यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांच्या अभिनयाची शैली आणि काम करण्याची पद्धत अनुभवण्याची संधी चित्रपटप्रेमींना या काळात मिळाली होती.
‘नटसम्राट’मुळे कुसुमाग्रजांच्या भूमीशी जोडला गेला दुवा
नाना पाटेकर यांच्या कारकिर्दीतील अत्यंत गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित या चित्रपटातील नानांच्या अभिनयाला मराठी प्रेक्षकांनी मोठी दाद दिली. ‘नटसम्राट’च्या निमित्ताने नाना पाटेकर आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाशिकमधील कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली होती. कुसुमाग्रजांची साहित्यभूमी असलेल्या नाशिकमध्ये त्यांच्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपटाशी संबंधित कलाकारांची उपस्थिती हा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा क्षण ठरला. यामुळे नाना पाटेकर आणि नाशिक यांच्यातील नाते केवळ चित्रपटापुरते मर्यादित राहिले नाही. साहित्य, रंगभूमी आणि सिनेमाला जोडणारा एक भावनिक दुवा या निमित्ताने निर्माण झाला.
Nana Patekar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि बेधडक ...
नाशिकमध्ये नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी
नाना पाटेकर यांनी १९९७ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या ७७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. या काळातील त्यांच्या नाशिक भेटीच्या आठवणी आजही सांस्कृतिक क्षेत्रात सांगितल्या जातात. याच काळात उदयोन्मुख चित्रकर्ती सुहास जोशी (पूर्वाश्रमीच्या रोहिणी बापट) यांनी नानांचे रांगोळीच्या माध्यमातून पोर्ट्रेट साकारले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलेल्या नाना पाटेकर यांनी या कलाकृतीचे कौतुक करत त्यांना शाबासकीची थाप दिली होती.
‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातूनही नाशिकशी नाते
अभिनयाइतकीच नाना पाटेकर यांची सामाजिक बांधिलकीही चर्चेत राहिली. अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी काम केले. या सामाजिक कार्यामुळेही नाना पाटेकर यांचा नाशिकशी वारंवार संबंध आला. मार्च २०२४ मध्ये नाशिकमध्ये आयोजित शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि ग्रामीण वास्तवावर आपले विचार मांडले.
नाशिककरांनी अनुभवले नाना पाटेकरांचे विविध पैलू
नाशिकने नाना पाटेकर यांना केवळ अभिनेता म्हणून पाहिले नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगवेगळे पैलूही अनुभवले. ‘प्रतिघात’मधील अभिनेता, ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारा सामाजिक कार्यकर्ता अशा विविध भूमिकांमधून नाना नाशिककरांच्या स्मरणात राहिले. पडद्यावर दमदार भूमिका साकारणारा कलाकार जेव्हा प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडतो, तेव्हा त्याच्या शब्दांना वेगळे महत्त्व प्राप्त होते. नाना पाटेकर यांच्या बाबतीतही नाशिकमध्ये हे अनेकदा अनुभवायला मिळाले.
जन्मभूमी नसली तरी नाशिकशी कायमचा जिव्हाळा
नाना पाटेकर हे मुळचे नाशिकचे नव्हते. मात्र त्यांच्या कलात्मक आणि सामाजिक प्रवासातील अनेक महत्त्वाचे क्षण नाशिकशी जोडले गेले. चित्रपट, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक कार्य अशा विविध माध्यमांतून त्यांचे नाशिकशी नाते अधिक घट्ट होत गेले. कलाकार आणि शहर यांच्यातील नाते केवळ भेटीगाठींनी ठरत नाही, तर त्या कलाकाराने शहराच्या सांस्कृतिक विश्वावर उमटवलेल्या ठशातून ते जिवंत राहते. नाना पाटेकर यांच्या बाबतीतही नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतींमध्ये त्यांच्या अनेक आठवणी कायम राहणार आहेत.
नानांच्या निधनानंतर त्यांच्या अभिनयाच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला जात असताना, नाशिकशी जोडलेला हा ऋणानुबंधही त्यांच्या चाहत्यांसाठी आणि नाशिककरांसाठी भावनिक ठेवा ठरणार आहे.





