मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR), सबस्क्रायबर डिटेल्स रेकॉर्ड्स (SDR) आणि मोबाईल लोकेशनचा डेटा पुरवणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र, झारखंड आणि बिहारमधून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये झारखंड आणि बिहार पोलीस दलातील दोन कार्यरत पोलीस हवालदारांचा (कॉन्स्टेबल) समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
'इन्स्पेक्टर संजय' बनून नागरिकांची फसवणूक
गुन्हे शाखेच्या युनिट-१२ (दहीसर) ला ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुप्त माहिती मिळाली होती. एक भामटा स्वतः पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून गहाळ किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. या आरोपीने इन्स्टाग्रामवर जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीला बळी पडलेले लोक त्याच्याशी संपर्क साधत असत. आरोपी स्वतःची ओळख "इन्स्पेक्टर संजय" अशी करून देऊन पैसे उकळायचा आणि आपल्या नेटवर्कचा वापर करून बेकायदेशीररीत्या CDR, SDR आणि लोकेशन ट्रॅक करत असे.
नोबेल शांताता 2026 पुरस्कार कोणाला मिळणार? याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून होती. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या पुरस्कारासाठी ...
गुन्हे शाखेची कारवाई अन् जोगेश्वरीतून आरोपी ताब्यात
माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-१२ च्या पथकाने २२ जून २०२६ रोजी जोगेश्वरी पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईलची तपासणी केली असता, तो शासकीय सेवेत नसतानाही आपल्या संपर्कांचा गैरवापर करून फोनचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन हस्तगत करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाळ्याचा शोध आणि ९ जणांची ओळख; मोठ्या प्रमाणात डेटा जप्त
तपासादरम्यान गुन्हे शाखेला या रॅकेटमध्ये मध्यस्थांमार्फत डेटा पुरवणाऱ्या ९ जणांच्या नेटवर्कची माहिती मिळाली. त्यापैकी ५ आरोपींना महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींनी आत्तापर्यंत तब्बल ५० कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR), ५२० पेक्षा जास्त सबस्क्रायबर डिटेल्स (SDR), ५५० हून अधिक मोबाईल क्रमांकांचे लोकेशन डिटेल्स आणि ४२० हून अधिक IMEI नंबरची माहिती बेकायदेशीरपणे मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून सध्या ७ मोबाईल जप्त करण्यात आले असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि त्यांनी हा डेटा कोणाकोणाला विकला आहे, याचा सखोल तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.