
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ ही असणार आहे. नवमतदारांसह ज्या पात्र नागरिकांचे नाव अजूनही मतदार यादीत नाही, त्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी १० आणि ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन अंतिम मतदार यादीत आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सुमारे ११ लाख अर्ज दाखल
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार राज्यभरात पुनरीक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत प्राप्त माहितीनुसार, नवीन नाव नोंदणीसाठी (नमुना-६) तब्बल ७ लाख १९ हजार ३८२ नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी (नमुना-८) ३ लाख ९९ हजार ९२५, तर नावे वगळण्यासाठी (नमुना-७) १८ हजार ७४८ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.
नवमतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी
१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले नवमतदार आणि पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेले नागरिक नमुना-६ भरून आपले नाव नोंदवू शकतात. त्यासाठी आवश्यक ती घोषणापत्रे आणि कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा आणि कुठे करावा ?
सांगली : नाट्यशास्त्र आणि रंगभूमीच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नाटककार, लेखिका व दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjpe) यांना यंदाचा ...
नागरिक आपले अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन सादर करू शकतात. याशिवाय १० व ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही हे अर्ज स्वीकारले जातील. ज्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ते भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करू शकतात.
नोटीस मिळालेल्या मतदारांसाठी महत्त्वाची सूचना
मागील विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या मतदारांच्या नोंदींमध्ये जुळवणी झालेली नाही (नो मॅपिंग) किंवा तार्किक विसंगती (लॉजिकल डिस्क्रिपन्सी) आढळल्यामुळे ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत, अशा मतदारांनाही या दोन दिवसीय विशेष शिबिरांमध्ये आपली कागदपत्रे सादर करता येतील. निवडणूक आयोगाने दिलेल्या १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी एखादे कागदपत्र उपलब्ध नसल्यास अन्य वैध पुरावे सादर करण्याची मुभा देण्यात आली असून, यासाठी बीएलओ ॲपवर (BLO App) ‘Any Other Documents’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने १२ ऑक्टोबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन सर्व पात्र मतदारांनी वेळेत अर्ज सादर करावेत आणि विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.






