Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेली विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा पर्याय विचाराधीन आहे. भाविकांची मोठी गर्दी आणि सुरू असलेल्या बांधकामांमुळे कामांना अडथळे येत असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, मंदिरातील नियमित पूजा-अर्चा सुरू राहणार असून, दर्शन बंद ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून घेतला जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी विकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान
सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये विविध विकासकामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दर्शन पथाची निर्मिती, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कुशावर्त तीर्थ परिसराचा विकास, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, घाटांची उभारणी, फरशी बदलणे आणि गोदावरी नदी प्रवाही करण्याच्या योजनेसह अनेक कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. दर्शन पथाच्या कामासाठी काही शासकीय इमारती हटवण्यात येत आहेत, तर विविध रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. या कामांमुळे परिसरात वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून, भाविकांच्या गर्दीमुळे विकासकामे पूर्ण करताना अडचणी निर्माण होत आहेत.
कुशावर्त तीर्थ ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी कुशावर्त तीर्थ परिसरातील कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याने हे तीर्थ ३१ ऑक्टोबरपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. आता त्र्यंबकेश्वर मंदिराबाबतही असाच पर्याय विचाराधीन असल्याने भाविकांचे लक्ष प्रशासन आणि देवस्थानच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
Nana Patekar's special bond with Nashik : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने कला आणि मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात ...
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विकासकामांचा आढावा
गुरुवारी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मंदिर परिसरातील कामे भाविकांची नियमित वर्दळ सुरू असताना पूर्ण करणे कठीण जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात देवस्थानचे विश्वस्त आणि नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्याशी चर्चा करण्यात आली. कामांना वेग देण्यासाठी मंदिर काही काळ भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा पर्याय चर्चेत आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन महिन्यांसाठी दर्शन बंद ठेवण्याचा विचार असून, या काळात मंदिरातील दैनंदिन धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
दिवस-रात्र कामे सुरू ठेवण्याचे नियोजन
विकासकामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना दिवस-रात्र काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ आणि वाढीव यंत्रसामग्रीचा वापर करून कामांचा वेग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडून ठेकेदारांची बैठकही आयोजित केली जाणार असून, प्रत्येक कामाचा आढावा घेऊन नियोजन निश्चित केले जाईल.
मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख अद्याप निश्चित नाही
त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतरच दर्शन बंद ठेवण्याचा कालावधी आणि अंतिम तारीख निश्चित होणार आहे. निर्णय झाल्यास भाविकांना त्याची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी विकासकामे वेळेत पूर्ण करणे आणि भाविकांची गैरसोय कमी करणे, या दोन्ही बाबी लक्षात घेऊन प्रशासनाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.