Thursday, October 8, 2026

Vidyavihar Railway Station : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज

सुरक्षित राहण्यासाठी महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी परस्पर समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी,

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

घाटकोपर परिसरातील पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील मुख्य उड्डाणपुलाची ध्वनीरोधक वगळता सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने अंतिम कामांना वेग देण्यात आला आहे. येत्या १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत हा उड्डाणपूल सर्वार्थाने वाहतुकीसाठी सज्ज होईल, अशा पद्धतीने कामाची अंतिम पूर्तता करण्यात येत आहे.

अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळास भेट देऊन उड्डाणपूल तसेच परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी परस्पर समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल दोन मार्गिकांचा असून, त्याची एकूण लांबी ६५० मीटर आहे. यामध्ये रेल्वे रुळांवर १०० मीटर लांबीचा पूल, पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूस ३३० मीटर लांबीचे पोहोच मार्ग बांधण्यात आले आहेत. उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्गाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, दोन्ही बाजूंच्या रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिन्यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उपरस्त्याला जोडण्यात आला आहे. या सर्व कामांची बांगर यांनी पाहणी केली.

सद्यस्थितीत मुख्य उड्डाणपुलाची सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली असून रंगकाम, दिवाबत्ती व्यवस्था, रस्ता तसेच इतर आवश्यक अंतिम कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ध्वनीरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.उड्डाणपूल प्रकल्पस्थळालगतच्या रस्त्यांवरील वाहतूक प्रवाह, प्रमुख जंक्शन, वाहतूक दिवे , वाहनांची वर्दळ तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबतही बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग तसेच गरजेनुसार वाहतूक नियमनाची व्यवस्था करावी, असे त्यांनी निर्देशित केले. तसेच, अधिक गर्दीच्या वेळेत उड्डाणपुलाच्या पोहोच मार्गांपासून वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, यासाठी वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही बांगर यांनी दिल्या. पोलिस उपायुक्त (वाहतूक - पूर्व विभाग) प्रदीप चव्हाण, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) नरेश मेघराजानी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >