‘प्रहार’च्या लेखणीतून महाराष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग खुला व्हावा! माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची अपेक्षा

‘प्रहार’च्या लेखणीतून समाजप्रबोधन घडावे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि कोकणातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी दिशा मिळावी. कोकणातील सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावून संपूर्ण प्रदेश समृद्ध होणे, हीच आपली प्रामाणिक इच्छा आहे, असेही खा. नारायणराव राणे यांनी सांगितले.

मुंबई : "एखादा माणूस श्रीमंत होण्यापेक्षा संपूर्ण कोकण समृद्ध होणे अधिक महत्त्वाचे आहे. कोकणासह महाराष्ट्रातील तरुणांनी नोकरीच्या शोधात भटकण्याऐवजी उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात उतरून मोठे उद्योजक व्हावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि आपल्या कुटुंबाला सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रयत्न करावेत. माझा कोकण समृद्ध होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने माझी कार्यपूर्ती झाली, असं मी म्हणेन. ‘प्रहार’ सुरू केला, योग्य ठिकाणी प्रहार केला आणि त्यातून समृद्धी निर्माण झाली, असे मला तेव्हाच म्हणता येईल. हे काम तुम्ही करावे, ही माझी अपेक्षा आहे. याच उद्देशाने मी ‘प्रहार’ला पुढे आणले. आता या लेखणीच्या बळावर तुम्ही त्याचे आर्थिक स्वरूप बदलून दाखवावे. दैनिक ‘प्रहार’च्या लेखणीतून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच कोकणाच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग खुला व्हावा, हीच माझी प्रामाणिक अपेक्षा आहे", अशी भावना दैनिक ‘प्रहार’चे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी रविवारी व्यक्त केली.


सत्याची धार आपल्या शब्दांतून जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या दैनिक ‘प्रहार’चा १८ वा वर्धापनदिन आणि त्यानिमित्त आयोजित ‘प्रहार गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ व ‘किलबिल चित्रकला स्पर्धा २०२६’ यांच्या बक्षीस वितरण समारंभात ना. राणे बोलत होते. दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात झालेल्या या सोहळ्याला दैनिक ‘प्रहार’चे संचालक तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी आमदार श्याम सावंत, दैनिक ‘प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे, महाव्यवस्थापक मनीष राणे, लेखा आणि मनुष्यबळ विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्पर्धक, पालक आणि मार्गदर्शक उपस्थित होते.


दैनिक ‘प्रहार’च्या 18 वर्षांच्या वाटचालीचा आनंद व्यक्त करताना राणे म्हणाले की, वृत्तपत्र सुरू करताना हा प्रवास कसा होईल, पत्रकारितेसाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि साधनसामग्री कशी उभी करता येईल, याबाबत अनेक प्रश्न होते. मात्र, आयुष्यात कोणतीही गोष्ट हाती घेतल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे, नुसता विचार करत बसायचे नाही, हे आपण ठरवले होते. त्याच भूमिकेतून ‘प्रहार’ची सुरुवात केली. आज 18 वर्षांनंतर वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी सभागृह भरून गेलेले पाहून आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह पाहून मनापासून समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रहार’च्या लेखणीतून समाजप्रबोधन घडावे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि कोकणातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी दिशा मिळावी. कोकणातील सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावून संपूर्ण प्रदेश समृद्ध होणे, हीच आपली प्रामाणिक इच्छा आहे, असेही खा. नारायणराव राणे यांनी सांगितले.



पत्रकारितेतून समाजाला दिशा मिळावी


‘प्रहार’च्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम हा आपल्या परिवाराचा सोहळा आहे. उपस्थित स्पर्धक, त्यांचे पालक, मार्गदर्शक आणि सहकारी हे सर्व ‘प्रहार’ परिवाराचाच भाग आहेत, असे राणे यांनी नमूद केले. चित्रकला आणि अन्य स्पर्धांसाठी निवडलेले विषय मुलांना विचार करण्याची संधी देणारे आहेत. अशा उपक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होते आणि महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. वृत्तपत्राने सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवरही जनजागृती करावी. तरुणांना उद्योग, व्यवसाय, रोजगार आणि शिक्षणाच्या संधींची माहिती द्यावी. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



मराठी माणसाने उद्योग क्षेत्रात पुढे यावे


मराठी माणसाच्या आर्थिक प्रगतीबाबतची तळमळ व्यक्त करताना खा. राणे यांनी केंद्रात एमएसएमइ' उद्योगमंत्री असतानाच्या अनुभवांचा उल्लेख केला. त्या वेळी देशातील उद्योग क्षेत्रातील मराठी माणसांचा सहभाग तपासला असता, तो एक टक्काही नसल्याचे आपल्या निदर्शनास आले होते, असे त्यांनी सांगितले.


मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मुंबईचा मोठा वाटा असताना, या अर्थव्यवस्थेत मराठी उद्योजकांचे स्थान काय आहे, याचाही विचार व्हायला हवा. मराठी माणसाने मुंबई आपली असल्याचा अभिमान बाळगण्याबरोबरच उद्योग-व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे राणे म्हणाले.


तरुणांनी नोकरी मिळवण्यापुरते ध्येय मर्यादित न ठेवता उद्योजक होण्याचे स्वप्न पाहावे. सुरुवातीला छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून त्याचा विस्तार करावा. महाराष्ट्रात मराठी उद्योजकांची संख्या वाढली पाहिजे. उद्योग क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांची नावे घेताना मराठी माणसांची नावेही अभिमानाने घेतली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. बँकांनी उद्योग करू इच्छिणाऱ्या तरुणांना मदत केली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचा उल्लेख करून राणे यांनी स्थानिक उद्योजकांना कर्ज आणि आवश्यक सहकार्य मिळण्याचे महत्त्व अधोरेखित केले.



कोकणातील विकासाला उद्योगांची जोड आवश्यक


मी मुख्यमंत्री, मंत्री असताना कोकणातील रस्ते आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर काम केले. सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्यांदा टँकरमुक्त केला. यंदा काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी पाणीटंचाईसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि शिक्षणाच्या गुणवत्तेतही सातत्याने सुधारणा झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.


सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रोजगारनिर्मिती वाढवण्याची गरज आहे. सिंधुदुर्गमध्ये माहिती-तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करण्याचा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तरुण परदेशात जाऊन माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतात, मग त्याच प्रकारचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध करून त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न का करू नयेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


दोडामार्ग परिसरात विमानतळाजवळ अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित कारखाने उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगताना, या माध्यमातून सुमारे एक लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे राणे यांनी नमूद केले. तरुणांनी आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करणार, किती कौशल्ये आत्मसात करणार आणि आपल्या कुटुंबाला चांगले जीवन कसे देता येईल, याचा विचार करावा. शिक्षणानंतर कमी वेतनाच्या नोकऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी अधिक कौशल्ये मिळवून चांगल्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.



मत्स्य आणि दुग्धव्यवसायात संधी


कोकणाला निसर्गाने समुद्र, शेती आणि अन्य नैसर्गिक साधनसंपत्ती दिली आहे. त्यांचा योग्य उपयोग करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करता येऊ शकतात, असे राणे म्हणाले. मत्स्यव्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेची जोड दिल्यास स्थानिक तरुणांना उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाची जबाबदारी सांभाळणारे नितेश राणे या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.


दुग्धव्यवसाय हा रोजगाराचा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे सांगताना त्यांनी कणकवली येथील गोवर्धन गोशाळेच्या उपक्रमाची माहिती दिली. विविध देशांतील गायींच्या जाती आणून त्यांचे संगोपन करण्यासोबतच दूध प्रक्रिया आणि त्यापासून विविध उत्पादने तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. चीज, ताक, दही आणि आइस्क्रीम यांसारखी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.


गायीपासून मिळणाऱ्या विविध घटकांचा उपयोग करून अनेक उत्पादने तयार करता येतात. त्यामुळे दुग्धव्यवसायाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक पद्धतीने त्याचा विकास करावा. योग्य व्यवस्थापन आणि प्रशिक्षणाच्या आधारे स्थानिक तरुणांनी या क्षेत्रात व्यवसाय सुरू करून स्वतःसह इतरांनाही रोजगार द्यावा, असे त्यांनी सुचवले.



संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा


आपल्या बालपणीच्या संघर्षाचा उल्लेख करताना राणे म्हणाले की, वडील गिरणीत काम करत होते. आजारपणामुळे त्यांना नोकरी सोडून गावी जावे लागले. आपण सहावीत असताना आईने आपल्याला चेंबूर येथे मामांकडे ठेवले आणि तीही गावी गेली. प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेले. आईला उधारी मागण्यासाठी दुकानात जावे लागत असे. ही परिस्थिती बदलून आईला कामासाठी बाहेर पडावे लागू नये, असा निर्धार आपण लहानपणीच केला होता. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना भावंडांना शिकवणे आणि त्यांना चांगले आयुष्य देणे, यासाठी आपण प्रयत्न केले. मुलांनाही परदेशात, अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले; मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परत येऊन देशासाठी काम करायचे आहे, हे स्पष्ट सांगितले होते. भारतीय भूमीचा आणि नागरिकांचा सन्मान राखून मिळवलेल्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा, अशी शिकवण आपण मुलांना दिल्याचे त्यांनी सांगितले.



अभ्यास, जिद्द आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा


सार्वजनिक जीवनात काम करताना कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे, असे राणे म्हणाले. आपण दररोज सात वृत्तपत्रे वाचतो. नवीन विधेयके किंवा अर्थविषयक विषय समोर आल्यास संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून माहिती घेतो. कापूस, ऊस, साखर किंवा अन्य विषयांचा थेट संबंध नसतानाही अभ्यासाच्या जोरावर सभागृहात भूमिका मांडता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


काही विषय समजून घेण्यासाठी तज्ज्ञांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करण्याचीही तयारी ठेवली. माहिती मिळवणे, तिचा अभ्यास करणे आणि योग्य वेळी तिचा उपयोग करणे ही कामाची पद्धत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


वृत्तपत्रांनीही वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याचा उल्लेख केला. आपल्यावर टीका होत असताना कोळेकर यांनी आंब्याच्या झाडाचे उदाहरण देत, फळे लागलेल्या झाडावरच दगड मारले जातात, असे सांगून पुढे चालत राहण्याचा सल्ला दिला होता. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही मागे पाऊल न घेण्याचे मार्गदर्शन केले होते. टीका झाली म्हणून थांबायचे नाही; मात्र आपली भूमिका मांडताना अभ्यास आणि वस्तुस्थितीची जोड असली पाहिजे, असे राणे म्हणाले.

Comments
Add Comment

उत्सवातील बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा; देवी चरणी साकडे घालत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका येथील ‘श्री जय अंबे माँ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळा’च्या आई दुर्गेश्वरीचे यंदा

कुंभमेळ्याच्या विकासकामांतून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये! अन्न व चाऱ्याच्या नियोजनावर मुख्यमंत्र्यांचा भर

राज्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना

पुढील वर्षीपासून ‘प्रहार भूषण’ पुरस्कार पुन्हा सुरू करणार, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई : समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि निःस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित

आडाचीवाडी ग्रामपंचायत ठरली महाराष्ट्रात सर्वोत्तम! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 5 कोटींचे बक्षीस

लोकसहभागाच्या जोरावर ग्रामसमृद्धीचा नवा आदर्श घालत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी

अहिल्यानगर येथे एफडीएची धडक कारवाई! प्रसिद्ध बेकरीचा परवाना निलंबित

अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी येथील 'रॉयल बेकर्स अँड कन्फेक्षनर्स' या