दैनिक ‘प्रहार’चा 18 वा वर्धापनदिन आणि ‘प्रहार गणेशोत्सव स्पर्धा 2026’ तसेच ‘किलबिल चित्रकला स्पर्धा 2026’ यांच्या बक्षीस वितरण समारंभानिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात नितेश राणे बोलत होते. या वेळी ‘प्रहार’चे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी आमदार श्याम सावंत, दैनिक ‘प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे, महाव्यवस्थापक मनीष राणे, लेखा व प्रशासन विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत यांच्यासह मुद्रित आणि डिजिटल विभागातील सहकारी, स्पर्धक, पालक व मान्यवर उपस्थित होते.
दैनिक ‘प्रहार’ची सुरुवात 9 ऑक्टोबर 2008 रोजी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दूरदृष्टीतून झाली. त्यानंतरच्या 18 वर्षांच्या प्रवासात अनेक अडचणींवर मात करत वृत्तपत्राने महाराष्ट्रातील महत्त्वाचे दैनिक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या वाटचालीचे श्रेय वृत्तपत्राच्या प्रतिनिधी आणि सहकाऱ्यांना देतानाच, ‘प्रहार’ सुरू करण्याचा निर्णय घेणाऱ्या खा. नारायण राणे यांच्या दूरदृष्टीचे नितेश राणे यांनी विशेष कौतुक केले.
‘प्रहार’च्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना ते म्हणाले की, खा. नारायण राणे यांनी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 9 ऑक्टोबर रोजीच दैनिक सुरू करण्याची तारीख निश्चित केली होती. त्यानंतर इंडिया बुल्सच्या तळमजल्यावरील जागेत पहिले कार्यालय सुरू झाले आणि पुढे नवव्या मजल्यावरील मोठ्या कार्यालयात स्थलांतर करण्यात आले. महाराष्ट्रावर संकटे आली किंवा राज्याच्या हिताविरोधात काही घडले, तर त्याविरुद्ध ठामपणे भूमिका मांडण्याची भूमिका ‘प्रहार’ने स्वीकारली. समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर प्रहार करणे, महाराष्ट्र आणि देशाच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या घटनांविरोधात आवाज उठवणे आणि वाचकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, या भूमिकेतून वृत्तपत्राने आपली वाटचाल केली. त्यामुळे वाचकांच्या मनात ‘प्रहार’ने विशेष स्थान निर्माण केले आहे, असे नितेश राणे म्हणाले.
वृत्तपत्राचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी आणि वाचकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी सातत्याने चर्चा केली जाते. वाचकांना ‘प्रहार’मध्ये काय वेगळे मिळू शकते, अन्य वृत्तपत्रे वाचणाऱ्या वाचकांना ‘प्रहार’कडे कसे आकर्षित करता येईल आणि वृत्तपत्राला त्यांच्या दैनंदिन वाचनाचा महत्त्वाचा भाग कसे बनवता येईल, यावर प्रतिनिधी आणि संपादकीय टीम काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘प्रहार’ला आपले हक्काचे वृत्तपत्र मानून त्याच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या प्रतिनिधींचे त्यांनी कौतुक केले.
राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले वृत्तपत्र बाजारपेठेत स्थान निर्माण करताना जाहिराती मिळवणे आणि विश्वासार्हता निर्माण करणे, अशी अनेक आव्हाने असतात. नव्या वृत्तपत्राकडे पाहताना काही जाहिरातदारांच्या मनात ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे किंवा विचारसरणीचे मुखपत्र असेल का, असा प्रश्न असू शकतो. मात्र, ना. नारायण राणे यांनी नेहमीच वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे लेख, बातम्या आणि विषय वाचकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असावेत, महाराष्ट्राला दिशा देणारे असावेत आणि देशाच्या भवितव्याशी संबंधित असावेत, असे मार्गदर्शन केले. त्याच भूमिकेतून ‘प्रहार’ने आजवरची वाटचाल केल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
मुद्रित माध्यमाबरोबरच डिजिटल माध्यमातील टीमचेही त्यांनी विशेष कौतुक केले. आजच्या पिढीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वृत्तपत्राने काळानुसार बदल स्वीकारणे आवश्यक आहे. ‘प्रहार’च्या पहिल्या वर्धापनदिनापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांकडे पाहिल्यास या बदलांची जाणीव होते. यंदाच्या वर्धापनदिन सोहळ्यातील ‘अभंग रिपोस्ट’चा कार्यक्रम हे त्याचे उदाहरण आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपत नव्या पिढीशी जोडले जाण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसतो, असे ते म्हणाले.
सध्या डिजिटल माध्यमांचा विस्तार झपाट्याने होत आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणारा एखादा व्हिडिओ काही क्षणांत लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. अशा स्पर्धात्मक वातावरणात ‘प्रहार’चे डिजिटल माध्यम मागे राहिलेले नाही. डिजिटल टीम बातम्यांचे सादरीकरण, दर्जा आणि आशय याबाबत चांगले काम करत असून, डिजिटल माध्यमावरील प्रेक्षकसंख्या दहा लाखांहून अधिक झाली आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. मुद्रित वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमातील सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे ही प्रगती साधता आली, असेही त्यांनी नमूद केले.
‘प्रहार भूषण’ पुन्हा सुरू होणार
‘प्रहार भूषण’ पुरस्काराची संकल्पना काही वर्षांपूर्वी खा. नारायण राणे यांनी मांडली होती. समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या आणि निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. ना. नारायण राणे यांची परवानगी घेतल्यानंतर पुढील वर्षीपासून ‘प्रहार भूषण’ पुरस्कार सोहळा पुन्हा आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा नितेश राणे यांनी केली.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना, विधिमंडळात तसेच मंत्रालयात विविध व्यक्तींशी संवाद साधताना ‘प्रहार’च्या कामाचे कौतुक ऐकायला मिळते, असे सांगून त्यांनी समाधान व्यक्त केले. काही नागरिकांकडून आणि अधिकाऱ्यांकडून वृत्तपत्राच्या कामाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मिळतात. नारायण राणे यांच्या विचारांतून घडलेल्या या वृत्तपत्राला महाराष्ट्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचे मनापासून अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
मुंबई : सत्याची धार आपल्या शब्दांतून जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या दैनिक ‘प्रहार’च्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळा रविवार, ११ ...
माध्यमांच्या स्पर्धेत ‘प्रहार’ कुठेही कमी पडणार नाही!
या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेले आमदार निलेश राणे यांचाही नितेश राणे यांनी उल्लेख केला. सिंधुदुर्ग जिल्हा ‘ट्रिगर वन’मध्ये समाविष्ट झाला असून, मालवण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र आहे. त्यामुळे निलेश राणे हे त्यांच्या मतदारसंघात पाणीटंचाईसंदर्भातील बैठकांमध्ये व्यस्त असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या वतीनेही ‘प्रहार’च्या संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक केले.
‘किलबिल चित्रकला स्पर्धे’ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘मी व माझे चित्र’ यांसारखे विषय मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे होते. स्पर्धेत पारितोषिक मिळणे किंवा न मिळणे ही औपचारिक बाब आहे; स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवणे आणि ‘प्रहार’च्या उपक्रमांना प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले.
‘प्रहार’च्या पुढील वाटचालीबाबत विश्वास व्यक्त करताना नितेश राणे म्हणाले की, मुद्रित वृत्तपत्रांच्या स्पर्धेत तसेच डिजिटल माध्यमांच्या वाढत्या विस्तारात ‘प्रहार’ कुठेही कमी पडणार नाही. वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि वृत्तपत्राची विश्वासार्हता वाढवण्यासाठी टीम सातत्याने प्रयत्न करेल.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास या क्षेत्रांत काम करताना उभारलेल्या पायावर पुढील काम उभे करण्याची जबाबदारी आपण पार पाडत असल्याचे सांगत त्यांनी नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.