
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर करण्यासाठी सेवा पुरवठा देणाऱ्या संस्थांची निवड करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आता केपीएमजी अॅडव्हायझरी सर्विसेस प्रा. लि या कंपनीची सल्लागार म्हणून निवड केली आहे. मासिक पावणे चार लाख रुपये एवढा खर्च गृहीत धरून वर्षाला तब्बल ४२ लाख रुपये या सल्लागार कंपनीवर रुग्णालयांचे पीपीपी मॉडेल वापरण्यासाठी खर्च केले जाणार आहे. जुलै २०२६ ते जुलै २०२७ या एक वर्षांच्या कालावधीसाठी सल्लागाराची निवड करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण, २०२६ मध्ये नमूद केल्यानुसार नियोजित प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला सल्लागार नियुक्त करणे आवश्यक आहे. या धोरणांतर्गत मे. केपीएमजी अॅडव्हायझरी सर्विसेस प्रा. लिमिटेड यांची एक वर्षांच्या कालावधीकरिता तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेद्वारे सद्यस्थितीत एमएमआरडीएने हस्तांतरीत केलेल्या लल्लूभाई कंपाऊंड रुग्णालय, पंजाबी गल्ली निदान केंद्र, सीटी स्कॅन, एमआरआय केंद्रे, डायलेसिस सेवा, कॅथ लॅब सेवा, सॉनोलॉजी सेवा, रक्तपेढी सेवा, पं. मदनमोहन मालविय शताब्दी रुग्णालय, गोवंडी या रुग्णालयाच्या आवारात नव्याने ५८० रुग्णशय्या असलेले रुग्णालय व १०० एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आणि के.बी.भाभा रुग्णालय, वांद्रे यांच्या शेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडावर १०० विद्यार्थ्यांच्या संख्या असलेले नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सेवा पुरवठादारांच्या नियुक्ती करण्यासाठी निविदा तथा स्वारस्य अर्ज मागवले आहेत. या मधून पंजाबी गल्ली निदान केंद्र, सीटी, एमआरआय केंद्रे, डायलेसिस सेवा, कॅथ लॅब सेवा, सॉनोलॉजी सेवा, रक्तपेढी सेवा या विविध सेवेंसाठी सुधार समिती तथा महानगरपालिका यांच्या मंजुरीने उच्चत्तम बोलीदाराची नियुक्ती करण्यात आली आहेत. परंतु , लल्लूभाई कंपाऊंड रुग्णालय, पं. मदनमोहन मालविय शताब्दी रुग्णालयाच्या आवारात १०० एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आणि के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे यांच्या शेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडावर १०० विद्यार्थ्यांच्या संख्या असलेले नर्सिंग महाविद्यालय उभारण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद प्राप्त झाला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी सद्यस्थितीत प्रस्ताव व मसुदापत्र उप प्रमुख लेखापाल (आरोग्य) विभागाच्या पडताळणीसाठी सादर करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त ९ विकसित सुविधा जसे की, मुलुंड येथे नुकतेच बांधलेले ४७० खाटांचे म.तु.अगरवाल रुग्णालय, जोगेश्वरी येथील १५० रुग्णशय्या असलेले ओशिवरा प्रसुती व बालरोग रुग्णालय व इतर प्रकल्प विचाराधीन आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका खाजगी भागीदारासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती मागविण्यासाठी विचार करत आहे. या सर्व प्रकल्पांसाठी प्रदीर्घ चालणारी सर्वसाधारण निविदाप्रक्रिया राबवण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाच्या धोरणाचे व कालमर्यादेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वैद्य पॅनलचा लाभ घेण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार केपीएमजी अॅडव्हायझरी सर्विसेस प्रा. लि. यांची निवड करण्यात आली आहे
या सल्लागार कंपनीकडून प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे, स्वारस्याची अभिव्यक्ती तयार करणे, आर्थिक मॉडेलिंग आणि बोली प्रक्रिया व्यवस्थापन यांचा स्पष्टपणे समावेश आहे.
ही सल्लागार कंपनी तज्ञ सल्ला देईल तसेच धोरण रचना आणि वित्तीय मॉडेलनुसार ' महापालिकेच्या रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी बेसलाइन लीज भाडे, प्रीमियम निर्देशक आणि पडताळणी मॅट्रिक्सची रचना करणे, स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्तावासाठी विनंती करणे आणि नोन-डिसक्लोझर करार यांचा मसुदा तयार करून त्यांना प्रमाणित करेल. तसेच गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड अंतर्गत विशेष पीपीपी निविदापूर्व बैठकांमध्ये साहाय्य करणे, प्रश्नांचे उत्तर देणे आणि तांत्रिक/आर्थिक प्रस्तावांचे मूल्यांकन करणे आणि नागरिक समाधानावर आधारित संवर्गनिहाय प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशक निश्चित करणे, कार्यप्रदर्शनवर आधारित प्रोत्साहन आणि मान्यता प्रणालीला संस्थात्मक स्वरूप देणे, विकसित भारत २०४७ शी सुसंगत राहून मुंबई महानगरपालिका आरोग्य लोकाभिमुख काम, डिजिटल पायाभूत सुविधा, एचएमआयएस सुधारणा आणि नागरिक केन्द्रित प्रणाली सक्षम करणे या सर्व बाबींकरिता सहकार्य करणार आहे असे प्रशासनाने नमुद केले आहे.





