Friday, November 27, 2026

Central Railway Block : पनवेल - कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक; काही एक्स्प्रेस गाड्या उशिरा धावणार

मध्य रेल्वेने पनवेल - कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी 29 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान दररोज मध्यरात्री 1.50 ते पहाटे 4.05 पर्यंत विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे कोकण कन्या, मंगळुरू, मडगावसह अनेक एक्स्प्रेस गाड्या उशिरा धावणार असून, सोलापूर एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे.

पनवेल येथे सुरू असलेल्या कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामासाठी मध्य रेल्वेने २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान दररोज मध्यरात्री विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक दररोज मध्यरात्री १.५० ते पहाटे ४.०५ वाजेपर्यंत असणार आहे. या काळात कर्जत अप आणि डाऊन मार्ग, दिवा - वसई - रोहा - पनवेल मार्ग, जसाई मार्ग आणि पनवेल स्थानकातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून पनवेल - कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्समधील पायाभूत सुविधांच्या सुधारणेचं काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे पनवेल येथे अधिक चांगल्या कोचिंग सुविधा, गाड्यांच्या देखभालीसाठी आधुनिक व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र संपूर्ण काम पूर्ण होऊन कॉम्प्लेक्स कार्यान्वित झाल्यानंतरच प्रवाशांना त्याचा पूर्ण लाभ मिळेल, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, २८-२९ नोव्हेंबरच्या रात्री नियोजित असलेला ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र २९ नोव्हेंबरला सुटणारी ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेस आता पहाटे ४ वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. २९-३० नोव्हेंबरच्या रात्री २२१९३ दौंड - ग्वाल्हेर सुपरफास्ट एक्स्प्रेस पोयांजे येथे ४५ मिनिटे थांबवली जाईल. तर १२१३४ मंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस जिते येथे एक तास, तर २०११२ मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्स्प्रेस सोमटणे येथे १० मिनिटे थांबवली जाईल.

३० नोव्हेंबर - १ डिसेंबरच्या रात्री २२११४ तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आपटा स्थानकावर दोन तास थांबवली जाईल. १२१३४ मंगळुरू एक्स्प्रेस जिते येथे एक तास आणि कोकण कन्या सोमटणे येथे १० मिनिटे थांबेल. १ डिसेंबरला सुटणारी मडगाव एक्स्प्रेसही पहाटे ४ वाजता सुटेल.१-२ डिसेंबरच्या रात्री २२१४९ एर्नाकुलम - पुणे एक्स्प्रेस आपटा येथे दोन तास थांबेल. तर ११३०४ सोलापूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसचा मार्ग बदलून ती कर्जत - कल्याण - ठाणे मार्गे चालवली जाईल. या गाडीला कल्याण येथे थांबा दिला जाणार आहे.२ ते ७ डिसेंबर दरम्यानच्या बदलांची माहिती नंतर दिली जाणार आहे. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक असून, होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >