
मुंबई, दि. १२ : राज्य उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोरील बेलापूर-ठाणे मार्गावर परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणारा बाराचाकी ट्रक पकडला. या कारवाईत एक हजार बॉक्समधील ४८ हजार मद्याच्या बाटल्या आणि ट्रक असा एकूण एक कोटी ३० लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. बेलापूर-ठाणे मार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोर सापळा रचला. यावेळी चॉकलेटी व पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा बाराचाकी ट्रक क्रमांक एमएच-१०-एडब्ल्यू-५२९४ अडविण्यात आला.
वाहनचालकाने ट्रकमध्ये साबणाचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र, पथकाने वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात खाकी रंगाचे बॉक्स आढळले. बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित, महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’च्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांवर बॅच क्रमांक व कमाल किरकोळ किंमत नमूद नसल्याचेही निदर्शनास आले. एकूण एक हजार बॉक्समधून ४८ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या.
पुणे : एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या ...
या प्रकरणी जावेदखान नवाबखान पिंजारी (वय २४) रा. गधडदेव, पो. बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई), ८०, ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाणे-१ चे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईत निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव, व्ही. व्ही. सकपाळ तसेच जवान ए. पी. राठोड, हर्षल खरबस, हनुमंत गाढवे आणि अमोल सानप यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव करीत आहेत.






