Friday, November 27, 2026

NCMC Card : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डमध्ये आता फक्त 5 रुपयांचा टॉपअप; प्रवाशांना मोठा दिलासा

एसटी महामंडळाने NCMC Card च्या किमान टॉपअपची मर्यादा ५० रुपयांवरून ५ रुपये केली आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला सवलतधारक आणि कमी अंतरासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, आता कार्डमध्ये गरजेनुसार छोटी रक्कम भरता येणार आहे.

NCMC Card : एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता या कार्डमध्ये केवळ ५ रुपयांचे टॉपअप करता येणार आहे. यापूर्वी कार्डमध्ये किमान ५० रुपयांचे टॉपअप करणे बंधनकारक होते. ही अट आता रद्द करण्यात आली असून, प्रवाशांना त्याचा थेट फायदा होणार आहे.एसटीच्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक लाभार्थ्यांसाठी १६ फेब्रुवारी २०२६ पासून एनसीएमसी कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राज्यभरात १ कोटी ४७ लाख कार्डांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी १ कोटी ३० लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत. ही आकडेवारीच या योजनेला प्रवाशांचा किती मोठा प्रतिसाद मिळत आहे, हे दाखवते.

हा निर्णय घेण्यामागचं मुख्य कारण म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रवाशांचा कमी अंतराचा प्रवास. अशा प्रवासासाठी भाडे खूप कमी लागतं. त्यातच अमृत ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास विनामूल्य आहे. त्यांना केवळ स्वच्छता अधिभार भरावा लागतो. अशा वेळी केवळ काही रुपयांसाठी कार्डमध्ये ५० रुपये ठेवणं प्रवाशांना अडचणीचं होत होतं. ही अडचण लक्षात घेऊन महामंडळाने किमान टॉपअपची मर्यादा ५ रुपयांवर आणली आहे.या निर्णयामुळे विशेषतः रोज कमी अंतरासाठी प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना आता कार्डमध्ये मोठी रक्कम अडकवून ठेवावी लागणार नाही. गरजेनुसार ५ रुपये, १० रुपये किंवा २० रुपये असं छोटं टॉपअप करता येईल. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक सुलभता मिळणार असून, डिजिटल प्रवासाकडे वाटचाल आणखी सोपी होणार आहे.

एसटी महामंडळाने गेल्या काही महिन्यांत डिजिटल तिकीट व्यवस्था, स्मार्ट कार्ड आणि कॅशलेस प्रवासावर भर दिला आहे. एनसीएमसी कार्ड हे केवळ एसटीसाठीच नव्हे, तर देशभरातील मेट्रो, बस आणि इतर सार्वजनिक वाहतुकीसाठीही वापरता येणारं एकच कार्ड आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळी कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही.ग्रामीण भागात अजूनही अनेक प्रवाशांना डिजिटल व्यवहारांची सवय नाही. मात्र कमी रकमेच्या टॉपअपमुळे त्यांचा विश्वास वाढेल आणि ते अधिक प्रमाणात कार्ड वापरण्यास पुढे येतील, असा विश्वास महामंडळाला आहे. ५ रुपयांच्या टॉपअपमुळे प्रवाशांचा आर्थिक भार कमी होईल आणि एसटीचा प्रवास अधिक सोयीचा, स्वस्त आणि सुलभ होईल, असं मत व्यक्त केलं जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >