AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटीत 214 धावांनी नमवलं, टीम इंडियाला असा होणार फायदा
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला नमवलं. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दावा पक्का केला आहे.
October 13, 2026 05:14 PM
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटीत 214 धावांनी नमवलं, टीम इंडियाला असा होणार फायदा (Photo: ICC Twitter)
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना डरबनच्या किंग्समीड मैदानात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 214 धावांनी जिंकला आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दावा पक्का केला. तर या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेला फटका तर भराताला फायदा होणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 390 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकन संघाने 284 धावांपर्यत मजल मारली. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 106 धावांची मजबूत आघाडी मिळाली. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 314 धावा केल्या आणि 4 विकेट हाती असताना डाव घोषित केला. यासह दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 420 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 206 धावा करू शकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 214 धावांनी विजय मिळवला.
दक्षिण अफ्रिकेला बसला फटका
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना होण्यापूर्वी आणि दक्षिण अफ्रिका संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र या सामन्यातील निकाल लागला आणि दक्षिण अफ्रिकेला फटका बसला आहे. दक्षिण अफ्रिकन संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 75 टक्के होती. मात्र पराभव होताच विजयी टक्केवारी घटली असून ती 60 टक्के झाली आहे. तर न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 72 असल्याने दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने 11 सामने खेळले असून 9 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यासह विजयी टक्केवारी ही 81.82 इतकी झाली आहे.
क्रिकेट खेळाने गेल्या काही वर्षात बरीच कात टाकली आहे. क्रिकेटचं स्वरूप आणि नियम यांच्यात खेळानुरूप सकारात्मक बदल होत गेले. त्या नियमांची ...
भारताला असा मिळणार लाभ
भारताला टॉप दोन पैकी पहिल्या स्थानावर जागा मिळवणं खूपच कठीण आहे. मात्र दुसऱ्या स्थानावर जागा मिळवू शकतात. यासाठी गुणतालिकेत पुढे असलेल्या न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेशचा पराभव झाला, तर पथ्यावर पडेल. • या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका (60%) आता भारताच्या (51.52%) अधिक जवळ आली आहे. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला असता, तर ते 75% किंवा त्याहून अधिक गुणांसह भारतापेक्षा खूप पुढे निघून गेले असते.ऑस्ट्रेलिया (81.82%) मजबूत स्थितीत आहे. असं असलं तरी न्यूझीलंड (72.22%), दक्षिण आफ्रिका (60%), बांगलादेश (55.56%) आणि भारत (51.52%) यांच्यात दुसऱ्या स्थानासाठीची स्पर्धा आता अत्यंत चुरशीची झाली आहे. भारताला आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला मागे टाकण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारतीय संघाला या सात सामन्यांपैकी पाच किंवा सहा सामने जिंकणं भाग आहे.