Tuesday, October 13, 2026

अबब...! 1.23 लाखांची 10 रुपयांची नाणी देत खरेदी केली दुचाकी; तीन वर्षे नाणी जमा करून स्वप्न केलं साकार

Telangana Pastor Buys Activa: तेलंगणातल्या 51 वर्षीय बी. रवी जोसेफ यांनी गेल्या 3 वर्षांपासून, पैसे साठवून आपलं स्वप्न साकारलं आहे.

तेलंगणा: तेलंगणातल्या मंचिर्याल जिल्ह्यातील लक्सेट्टिपेटमधील 51 वर्षीय बी. रवी जोसेफ यांनी पैसे साठवून आपलं स्वप्न साकारलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून, जोसेफ आपल्या दैनंदिन खर्चातून प्रत्येकी 10 रुपयांची नाणी बाजूला साठवत तब्बल 1.23 लाखांची नवी होंडा ॲक्टिव्हा खरेदी केली आहे. भाजीपाला किंवा किराणासह इतरत्र कुठेही खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर उरलेली 10 रूपयांची नाणी ते बाजूला काढून ठेवत. त्या माध्यमातून जोसेफ यांनी आपलं स्वप्न साकार केलं आहे.

जोसेफ एका चर्चमध्ये पास्टर म्हणून काम करतात. 10 रूपयांची नाणी जमवण्यासाठी जोसेफ यांनी 10 ऑक्टोबर 2023 पासून सुरूवात केली. तेव्हापासून ते आतापर्यंत जोसेफ बाजारातून कोणतीही वस्तू विकत घेतल्यानंतर उरलेल्या पैशांतून 10 रूपयांची नाणी बाजूला काढून ठेवायचे. त्या माध्यमातूनच त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. 10 रूपयांच्या नाण्यांची बचत करताना त्यांना कुटुंबातील सदस्यांचा विरोध सहन करावा लागला होता. विरोध मिळत असतानाही जोसेफ यांनी चिकाटीने प्रयत्न करत आपले स्वप्न साकारले. 1 लाख 23 हजारांची 10 रूपयांची नाणी मोजण्यासाठी शोरूममधील स्टाफला तब्बल दोन तासांचा अवधी लागला.

 

रवी जोसेफ यांनी एवढी मोठी रक्कम एकाच वेळी बचत केली नाही. बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर उरलेल्या पैशांतून 10 रूपयांच्या नाणींची रोज बचत करून ठेवायचे. NDTV सोबत बोलताना रवी म्हणाले की, "गेली तीन वर्षे मी जेव्हा जेव्हा किराणा दुकानात किंवा बाहेर जायचो, तेव्हा थोडे थोडे पैसे साठवत गेलो. या काळात मी जवळपास 1 लाख 23 हजार रुपये जमा केले," बचत केलेल्या पैसे सुरूवातीला काही घरगुती कामांसाठी बचत करण्याचा निर्णय रवी यांनी घेतला होता. पण रक्कम जसजशी वाढत गेली, तसतशी त्यांनी स्वत: दुचाकी विकत घेण्याचा विचार केला. बचत केलेली 10 रूपयांची नाणी तब्बल 12,300 इतकी होती.

घरच्यांचा रवी यांना नाणी गोळा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात होता. 10 रुपयांची नाणी बंद होणार आहेत किंवा त्याचा बाजारात वापर केला जाणार नाही, अशा अफवा होत्या. पण जोसेफने हार मानली नाही. त्याचा हा पैसे साठवण्याचा प्रवास काही सोप्पा नव्हता. मुलाखती दरम्यान रवी म्हणाले की, "माझ्या घरच्यांनी मला नाणी साठवू नकोस, असं थेट सांगितलं होतं, पण मी हार मानली नाही. मी प्रत्येक खरेदीनंतर उरलेली नाणी साठवत राहिलो. शेवटी मी केलेल्या प्रयत्नाचे फळ मला मिळाले." दरम्यान, 1 लाख 23 हजार रुपयांची 12,300 इतकी जमलेली नाणी जेव्हा रवी लक्सेटिपेटमधील जगदंबा होंडा मोटर्स शोरूममध्ये घेऊन गेले, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना ती मोजण्यासाठी तब्बल दोन तासांचा वेळ लागला.

होंडा ॲक्टिव्हाची डिलिव्हरी घेताना रवी यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. रोजच्या व्यवहारातील सुट्टे पैसे साठवून स्वतःची नवी दुचाकी घेण्याचं त्यांचं स्वप्न या तीन वर्षांच्या मेहनतीमुळे अखेर पूर्ण झालं आहे. नाण्यांच्या स्वरूपात केलेल्या या अनोख्या पेमेंटची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि होंडाच्या शोरूममध्ये जोरदार होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा