पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे सुपरमार्केटमधील शेकडो फ्रिज आणि फ्रिजर्स अचानक गरम झाले, ज्यामुळे त्यातील ताजे आणि गोठवून ठेवलेले अन्नपदार्थ खराब झाले. या गंभीर प्रकारामुळे दुकानदारांचे लाखो युरोंचे नुकसान झाले असून, अन्नाचा वापर आता 'शस्त्र' म्हणून केला जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले?
हॅकर्सनी सुपरमार्केटमधील फ्रिज आणि फ्रिजर्सचे तापमान नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरचा ताबा घेतला. सामान्यतः रात्रीच्या वेळी बर्फ वितळवण्याच्या (डिफ्रॉस्ट) प्रक्रियेत फ्रिजचे तापमान किंचित वाढते; मात्र यावेळी हॅकर्सनी तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत (120 अंश फॅरेनहाइट) वाढवून ते तसेच गरम राहतील अशा कमांड दिल्या. यामुळे अनेक सुपरमार्केटमधील व्यवस्थापकांना सकाळी फ्रिजर्समधून गरम हवेच्या झळा जाणवल्या, तर काही ठिकाणी आग लागल्याच्या घटनाही घडल्या.
कोणत्या सुपरमार्केट्सना बसला फटका?
'कोऑपरेटिव्ह यू' या सुपरमार्केट साखळीच्या 100 हून अधिक दुकानांसह 'इंटरमार्शे', 'नेट्टो', 'कॅरेफोर', 'मोनोप्रिक्स' आणि 'ई. लेक्लेर्क' यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या जवळपास 400 दुकानांना या सायबर हल्ल्याचा तडाखा बसला. डॅनिश कंपनी डॅनफॉस (Danfoss) या कंपनीच्या सॉफ्टवेअरला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. डॅनफॉसने स्पष्ट केले की, ज्या उपकरणांवर हल्ला झाला ती जुनी मॉडेल्स होती, ज्यांचे सॉफ्टवेअर अद्ययावत (अपडेट) करता येत नव्हते.
पनामा : मध्य अमेरिकेतील पनामा देशात दोन शक्तिशाली भूकंपांचे धक्के बसल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच, मंगळवारी (13 ऑक्टोबर) सकाळी पुन्हा एकदा 6.1 तीव्रतेच्या ...
अन्नाचा साठा फेकून द्यावा लागला
ग्राहकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून, ज्या अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेची खात्री देता येत नव्हती, ते सर्व ताजे आणि गोठवलेले अन्नपदार्थ खबरदारी म्हणून फेकून देण्यात आले. अल्सास प्रांतातील दोन सुपरमार्केट्सनाच 2 लाख 70 हजार युरोचे नुकसान सहन करावे लागले असून, देशभरातील एकूण नुकसान लाखो युरोंवर पोहोचले आहे. फ्रान्सच्या सरकारी वकिलांनी याप्रकरणी सायबर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, युरोपियन फूड कमिशनर ख्रिस्तोफ हॅन्सन यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, "अन्नसुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, कारण अन्नाचा वापर आता शस्त्र म्हणून केला जात आहे," असे म्हटले आहे.