Tuesday, October 13, 2026

'एमपीएससी आंदोलन विद्यार्थ्यांचे नव्हे तर कार्यकर्त्यांचेच असल्याचे सिद्ध' आमदार विक्रम पाचपुते यांनी केली पोलखोल

एमपीएससीचे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करणारे आणि संविधान मानणारे आहेत. मात्र, आंदोलन मागे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तिथे साधी पाण्याची बाटली, चार्जर किंवा पॉवर बँक कोणीही विसरले नव्हते. इतकेच काय, कॉफी मगही कुणी विसरले नव्हते. मात्र, ते भारताचा ध्वज आणि संविधानाची प्रत आंदोलनस्थळी कसे विसरले, हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे. यावरून या आंदोलनाचे नियोजन रोहित पवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते करत होते, हे सिद्ध झाले. संविधान फक्त हातात घ्यायचे, त्याचा दाखला द्यायचा आणि त्याच संविधानाची पायमल्ली करायची, असा प्रयत्न रोहित पवार आणि त्यांच्या टीमने केल्याचा घणाघात आमदार विक्रम पाचपुते यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार पाचपुते यांनी आंदोलनास्थळीचे दोन व्हिडीओ दाखवत आंदोलनाची पोलखोल केली.

आंदोलन मागे घेतल्यावर केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर या व्यासपीठावर आलेल्या वेगवेगळ्या पक्षांतील अनेक नेत्यांनाही एक प्रश्न पडला की नेमके हे आंदोलन कशासाठी होते आणि त्यातून काय साध्य झाले? आपण तिथे भाषणे केली ती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी केली होती की रोहित पवारांचे राजकीय लॉन्चिंग व्हावे, त्यांना राज्यस्तरीय नेता होता यावे, यासाठी केली होती? आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. 6 तारखेला मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती. त्यानंतर 10 तारखेला आणखी एक बैठक झाली. या दोन्ही बैठकांमधील निर्णय मान्य नसल्याने रोहित पवारांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी 30 तारखेला पुन्हा एकदा बैठक घेतली. या बैठकीत न्यायालयीन चौकशी करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेची बाब त्यांच्या शिष्टमंडळाने बाहेर येऊन माध्यमांसमोर सांगितली होती. मग यातून रोहित पवारांनी नेमके काय साध्य केले, असा सवाल आ. पाचपुते यांनी उपस्थित केला.

रोहित पवार आपला आणि आपल्या भावनांचा गैरवापर करत आहेत आणि अध्यक्षांचा राजीनामा होऊ शकत नाही. आपला भ्रमनिरास होत आहे, हे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की तेव्हा ते विद्यार्थी तिथून उठून परतीच्या मार्गाला लागले. रोहित पवार त्यांना थांबण्याची विनंती करत होते; मात्र विद्यार्थी तिथे थांबले नाहीत, असे एका व्हिडीओत दिसत असल्याचे आ. पाचपुते यांनी स्पष्ट केले.

दुर्दैवाची बाब म्हणजे, हे आंदोलन थांबवण्यासाठी राहुल गांधी यांनी यावे आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जावे, अशी रोहित पवार यांची इच्छा होती. मात्र, रोहित पवार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना एकत्र आणू शकत नाहीत हे राहुल गांधी यांच्याही लक्षात आले. त्यानंतर जे आधी ठरले होते, तेच मान्य झाले. 30 तारखेला ठरलेला मुद्दाच मान्य करण्यात आला. न्यायालयीन चौकशीही निश्चित झाली होती. विवेक भीमनवार यांनी स्वतःच्या इच्छेने आणि नैतिकतेच्या आधारावर रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे सक्तीच्या रजेवर पाठवलेले नसतानाही आताही रोहित पवार चुकीचे कथानक मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने तसा आदेश दिल्याची तुमची माहिती असेल तर परवा तुम्ही मुख्य सचिवांच्या सहीचा दाखला देत होता, तसा एखादा आदेश तुमच्याकडे असेल तर तो माध्यमांसमोर आणा, असे आव्हान आ. पाचपुते यांनी रोहित पवारांना दिले.

रोहित पवारांना मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच आम्हीही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की, त्यांच्या मागणीनुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 317 नुसार अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची प्रक्रिया थेट राबवता येत नाही. मात्र, ही बाब समजून घेण्यासाठी रोहित पवारांना 12 दिवस लागले, म्हणूनच मी त्यांना महाराष्ट्राचा नवीन ‘पप्पू’ म्हणतो. त्यांना गोष्टी लक्षात येतात; मात्र त्या समजायला थोडा वेळ लागतो. त्यांची ट्यूबलाईट अजूनही जुन्या प्रकारची आहे. आता एलईडीचा जमाना आहे, पण ते अजूनही जुन्याच प्रकारात आहेत, असे म्हणायला हरकत नाही, असा टोलाही आ. पाचपुते यांनी लगावला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >