कोलकाता : पश्चिम बंगालमधून नवरात्रीच्या काळात एक अत्यंत आश्चर्यकारक आणि कुतूहल निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. पुरुलिया जिल्ह्यातील जयपूर राजवाड्यातील दुर्गाोत्सवाची सध्या देशभरात चर्चा रंगली आहे, कारण येथील दुर्गा मातीची किंवा इतर धातूची नसून चक्क सोन्याची आहे. विशेष म्हणजे, ही सोन्याची मूर्ती वर्षातील जवळपास ३६० दिवस बँकेच्या लॉकरमध्ये कुलूपबंद असते!
बँक लॉकर ते राजवाडा असा खास प्रवास
आपण सर्वजण नवरात्रीत उत्साहात माती किंवा इतर धातूंच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतो आणि नंतर विसर्जन करतो. पण जयपूर राजवाड्यातील पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. येथील सोन्याची देखणी मूर्ती संपूर्ण वर्षभर कडक पोलिस बंदोबस्तात बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जाते. फक्त नवरात्रीच्या षष्ठीच्या दिवशी ही मूर्ती मोठ्या सुरक्षेत बँकेतून बाहेर काढून राजवाड्यात आणली जाते आणि तिथे अगदी थाटामाटात तिची पूजा केली जाते. त्यानंतर, विजयादशमी संपल्यावर पुन्हा तीच पवित्र मूर्ती सन्मानाने आणि पोलिस संरक्षणात बँकेच्या तिजोरीत परत पोहोचवली जाते. या मूर्तीसोबतच तिथले चांदीचे सुंदर 'चलचित्र' पाहण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक आणि भाविक गर्दी करतात.
आग लागल्याची दुर्घटना अन् सोन्याची मूर्ती बसवण्याचा दृष्टांत
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत निर्विवाद ...
राजघराण्याच्या इतिहासावर नजर टाकल्यास ही परंपरा तब्बल ४०० वर्षे जुनी असल्याचे समजते. राजा जयसिंह यांच्या काळापासून या भागात पूजा करण्याची रीत चालत आली आहे. पुढे राजा काशीनाथ सिंह यांच्या कारकिर्दीत मंदिरामध्ये अचानक आग लागल्याची एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर राजाला स्वप्नात माता दुर्गेने सोन्याची मूर्ती बसवण्याचा दृष्टांत दिला, अशी अख्यायिका आहे. राजाने हा दैवी संकेत मानून बनारसच्या अत्यंत कुशल कारागिरांना बोलावून घेतले आणि स्वतःच्या खजिन्यातील सोन्या-चांदीचा वापर करून ही भव्य मूर्ती घडवून घेतली.
एका चोरीच्या घटनेमुळे बदलली सुरक्षेची संपूर्ण यंत्रणा
पूर्वीच्या काळापासून ही सोन्याची मूर्ती राजवाड्यातच राहत असे. परंतु, काही काळापूर्वी राजवाड्यात एक मोठी चोरी झाली, ज्यामध्ये चोऱ्या करून अनेक मौल्यवान दागिने आणि वस्तू पळवण्यात आल्या. या घटनेमुळे राजवाड्याच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांच्या सल्ल्यानुसार आणि सुरक्षेची खबरदारी म्हणून, पूजेचे काही दिवस सोडले तर उर्वरित संपूर्ण वर्षभर देवीची ही मौल्यवान मूर्ती बँकेच्या सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्याचा कडक नियम तयार करण्यात आला. हा नियम आजतागायत अगदी तंतोतंत पाळला जातो.
पिढ्यानुपढ्या जतन केलेली खानदानी परंपरा
राजघरायाचे सदस्य प्रशांत नारायण सिंह देव सांगतात की, त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि परंपरेनुसार साजरा केला जातो. सुरुवातीला येथे साध्या पद्धतीने मातीचीच मूर्ती बसवली जायची, पण एका प्रसंगानंतर सोन्याची मूर्ती स्थापन करण्याची परंपरा सुरू झाली. आधी हा उत्सव फक्त चार दिवसांचा असायचा, पण आता लोकांचा वाढता ओघ आणि उत्साह पाहून हा उत्सव पाच दिवसांपर्यंत साजरा केला जाऊ लागला आहे.
राजेशाही थाट आणि आजचा कडक बंदोबस्त
राजवाड्यातील जुन्या आठवणींना उजाळा देताना रुनी बनर्जी यांनी सांगितले की, जुन्या काळात इथे होणारी दुर्गा पूजा अतिशय दिमाखदार आणि राजेशाही थाटात असायची. त्याकाळात पूजेच्या वेळी राजवाड्यात हत्ती, घोडे आणि हजारो लोकांची मोठी रेलचेल पाहायला मिळायची. जरी आज सुरक्षेच्या कारणास्तव मूर्ती बँकेतून आणावी लागत असली, तरीही षष्ठीपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाचा उत्साह आणि पावित्र्यामध्ये तिळमात्रही फरक पडलेला नाही. आजही नवरात्रीच्या दिवसांत जयपूर राजवाड्यात आई दुर्गेचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची अफाट गर्दी लोटते.