Wednesday, October 14, 2026

Nashik Kumbh Mela: धर्म ध्वजा फडकवताच नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला होणार सुरूवात, वेगळेपण काय ते जाणून घ्या

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरूवात होणार आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर या सोहळ्याला अधिकृतरित्या सुरूवात होणार आहे. या कुंभमेळ्यात तीन अमृतस्नानासह शुभ मुहूर्तावर कोट्यवधी भाविक गोदावरीच्या पवित्र पात्रात श्रद्धेची डुबकी मारतील.

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे साधुसंतांसह भाविकांना वेध लागले आहेत. 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण विधी पार पडल्यानंतर या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. कुंभमेळा सनातन धर्मातील सर्वात मोठा धार्मिक आणि अध्यात्मिक उत्सव आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहण दोन स्थान केलं जातं. नाशिकच्या रामकुंड घाट आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडाजवळ ध्वजारोहण होते. त्यासाठी या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे एकाच वेळी ध्वजारोहण केलं जाणार आहे. रामकुंडावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर कुशावर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केलं जाईल. या ध्वजारोहण कार्यक्रमात केंद्र आणि राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे.

21 महिने असणार नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा यावेळी 21 महिन्यांचा असणार आहे. कुंभमेळ्याची सुरूवात 31 ऑक्टोबर 2026 पासून होईल आणि त्याची सांगता 24 जुलै 2028 रोजी होणार आहे. जवळपास दोन वर्षे हा सोहळा चालणार आहे. नाशिक कुंभमेळा 2027 संपूर्ण वेळापत्रक
  • ध्वजारोहण : 31 ऑक्टोबर 2026
  • नगर प्रदक्षिणा: 29 जुलै 2027
  • पहिले अमृतस्नान: 2 ऑगस्ट 2027
  • दुसरे अमृतस्नान: 31 ऑगस्ट 2027
  • तिसरे अमृतस्नान (नाशिक): 11 सप्टेंबर 2027
  • तिसरे अमृतस्नान (त्र्यंबकेश्वर): 12 सप्टेंबर 2027
  • सांगता कार्यक्रम: 24 जुलै 2028

नाशिक कुंभमेळ्याचं काय आहे वेगळेपण?

देशातील चार शहरात कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. पण नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा थोडा वेगळा असतो. कारण नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त येथे अमृतस्नान होतं. वैष्णव आखाडे प्रभू रामांच्या वनवास स्थळ असलेल्या पंचवटीच्या नाशिकमधील रामकुंडातील गोदावरीच्या पवित्र पात्रात अमृतस्नान करतील. तर शैव आखाडे त्र्यंबकेश्वर अर्थात शिवनगरीतील गोदावरी नदी उगम पावलेल्या कुशावर्त कुंडात अमृतस्नान करतील.

नाशिक कुंभमेळ्याचं इतिहास काय सांगतो?

इतिहासातील नोंदीनुसार, 18व्या शतकात राज्यात पेशव्यांची सत्ता होती. त्या काळात पहिल्या अमृतस्नानावरून शैव आणि वैष्णव आखाड्यात हिंसक वाद झाला होता. त्यामुळे पेशव्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावर बंधनं लादली होती. त्यानंतर मधला मार्ग म्हणून आणि साधुसंतांनी विचारविनिमय केल्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तावर शैव आणि पंचवटीच्या रामकुंडावर वैष्णव साधु अमृतस्नान करतील, असं ठरवलं. तेव्हापासून आतापर्यंत हीच परंपरा सुरू आहे. म्हणजेच सिंहस्थ कुंभमेळ्यात दोन ठिकाणी अमृतस्नान होतं. शैव आणि वैष्णव यांच्यासह उदासीन संतांचे मिळून 13 आखाडे आहेत.

कोणते आखाडे आणि कुठे अमृतस्नान करणार?

नाशिक सिंहस्थ महाकुंभमेळ्यात वैष्णव संप्रदायाचे 3 आखाडे नाशिकच्या रामकुंडावर, तर शैव, उदासीन आणि निर्मल संप्रदायाचे 10 आखाडे त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर अमृतस्नान करतात. नाशिक (रामकुंड घाट) येथे केवळ वैष्णव संप्रदायाचे साधू स्नान करतात. यात श्री दिगंबर अनी, श्री निर्वाणी अनी आणि श्री निर्मोही अनी या तीन प्रमुख आखाड्यांचा समावेश होतो.तर त्र्यंबकेश्वर (कुशावर्त कुंड) येथे शैव संप्रदायाचे 7 आखाडे (जुना, निरंजनी, महानिर्वाणी, आवाहन, अटल, आनंद आणि अग्नि आखाडा), तसेच उदासीन व निर्मल संप्रदायाचे 3 आखाडे (बडा उदासीन, नया उदासीन आणि निर्मल आखाडा) अमृतस्नान करतात.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >