Nashik Kumbh Mela: नाशिक कुंभमेळा का आहे खास? सिंहस्थ नाव कसं पडलं? का केलं जातं पिंडदान आणि तर्पण?
नाशिक कुंभमेळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रयागराजमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यानंतर आता नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. त्यामुळे या कुंभमेळ्याकडे देश विदेशातील भाविकांचं लक्ष लागून आहे. चला जाणून घेऊयात या कुंभमेळ्याशी निगडीत गोष्टी...
October 14, 2026 01:48 PM
Nashik Kumbh Mela: नाशिक कुंभमेळा का आहे खास? सिंहस्थ नाव कसं पडलं? का केलं जातं पिंडदान आणि तर्पण? (Photo: ANI)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या वर्षी महाकुंभ सोहळा पार पडला. या कुंभमेळ्यात जवळपास 66 कोटी भाविकांनी श्रद्धेच्या पवित्र संगमात डुबकी मारली. 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान हा महाकुंभमेळा पार पडला. 26 फेब्रुवारी 2025 च्या महाशिवरात्रीला या कुंभमेळ्याची सांगता झाली. जवळपास 45 दिवस हा कुंभमेळ्याचा सोहळा रंगला. या कुंभमेळ्यांची भव्यता पाहता कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे आणि गेल्या हजारो वर्षांची परंपरा या कुंभमेळ्याला लाभली आहे. भारतातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होतं. त्याला कारणंही तसंच आहे. समुद्रमंथनावेळी निघालेल्या अमृतकुंभातील काही थेंब या ठिकाणी पडल्याने त्याचं धार्मिक महत्त्व आहे. यात उत्तर प्रदेशचं प्रयागराज, उत्तराखंडचं हरिद्वार, महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशातील उज्जैन ही ठिकाणं आहेत. दर तीन वर्षांनी यापैकी एका ठिकाणी कुंभ असतो. 12 वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्ण कुंभ म्हंटलं जातं. आता नाशिक कुंभमेळ्याचे वेध साधुसंत आणि भाविकांना लागले आहेत.
नाशिकमध्ये कुंभमेळा कधी भरतो?
नाशिकमध्ये 2026 ते 2028 या वर्षातील 22 महिन्यांच्या कालावधीत कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे. त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड येथे अमृतस्नान केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरू अर्थात बृहस्पती ग्रह सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळ्याला सुरूवात होते. ग्रहांची स्थिती पाहता नाशिक येथे आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्याला सिंहस्थ कुंभमेळा असं संबोधलं जातं. पौराणिक कथा आणि भाविकांच्या श्रद्धेनुसार, नाशिकच्या कुंभमेळ्यात पवित्र गोदावरी नदीत स्नान केलं केलं की पापमुक्ती मिळते. इतकंच काय तर मोक्ष प्राप्तीला गती मिळते, असं मानलं जातं. अमृतस्नान सोहळ्यात विविध आखाड्याचे साधुसंत एकत्र येतात आणि अमृतस्नान करतात. या सोहळ्यादरम्यान, नदीतील जल अमृततुल्य होते असं बोललं जातं. त्यामुळे पुण्यप्राप्ती होते, अशीही साधुसंतांच्या आखाड्यांमध्ये मान्यता आहे. इतकंच काय तर या गोदावरीत स्नान करण्यासाठी देव येतात, अशी श्रद्धा आहे. या पवित्र जल असलेल्या पात्रात स्नान केल्याने पुर्नजन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते, असंही बोललं जातं.
Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेली विकासकामे वेगाने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा पर्याय विचाराधीन आहे. ...
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं महत्त्व
कुंभमेळा आयोजित होणाऱ्या ठिकाणी सहा वर्षात अर्धकुंभ आणि 144 वर्षानंतर होणाऱ्या कुंभला महाकुंभ म्हंटलं जातं.नाशिकमध्ये 2026 पासून सुरू होणारा सिंहस्थ कुंभमेळा पूर्ण कुंभमेळा आहे. नाशिकमध्ये 12 वर्षांनी कुंभ होत असल्याने हा पूर्ण कुंभमेळा आहे. यापूर्वी 2015 या वर्षी कुंभमेळा पार पडला होता. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होणार आहे. ध्वजारोहणाने या सोहळ्याला सुरूवात होईल. 29 जुलै 2027 ला नगर प्रदक्षिणा, 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं अमृतस्नान, 31 ऑगस्ट 2027 ला दुसरं अमृतस्नान, 11 सप्टेंबर 2027 ला तिसरं अमृतस्नान, 12 सप्टेबंर 2027 ला त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरं अमृतस्नान आणि 24 जुलै 2028 ला कुंभमेळ्याची सांगता होईल.
कुंभमेळ्यात आखाड्यांचं महत्व आणि पिंडदान
कुंभमेळ्यात आखाड्यांचं विशेष आकर्षण आहे. विविध आखाड्यांचे साधुसंत भव्य मिरवणूक काढत अमृतस्नान करतात. आखाड्यांची भव्यता पाहण्यासाठी लाखो भाविक येतात. या आखाड्यांची स्थापना आदि शंकराचार्यांनी केली आहे. दुसरीकडे, नाशिक कुंभमेळ्यात पूर्वजांना गती प्राप्त होण्यासाठी पिंडदान आणि तर्पणही केलं जातं. यामुळे पितरांना मोक्षप्राप्ती होते असं बोललं जाते. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यात हजारो लोकं पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी पिंडदान करतात.