Wednesday, October 14, 2026

शिखर धवनच्या नावाचा गैरवापर? पाकिस्तानी खेळाडूंसोबत नाव जोडल्याने संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा

पाकिस्तानी खेळाडूंसोबत संघात नाव झळकल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन संतापला आहे. धवनने वर्ल्ड टी-20 कॉन्टिनेंट कपच्या आयोजकांवर आपल्या परवानगीशिवाय नाव वापरल्याचा आरोप केला असून, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनने 'वर्ल्ड टी-20 कॉन्टिनेंट कप' (World T20 Continent Cup) च्या आयोजकांविरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या नकळत आणि परवानगीशिवाय स्पर्धेच्या सहभागी खेळाडूंच्या यादीत आपले नाव समाविष्ट केल्यामुळे धवनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देत चाहत्यांना व प्रसारमाध्यमांना खोट्या वृत्तांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

आगामी काळात होणाऱ्या या टी-20 स्पर्धेत शिखर धवनला 'एशिया वॉरियर्स' (Asia Warriors) संघाचा भाग असल्याचे दाखवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या संघात पाकिस्तानचे अनेक आक्रमक माजी खेळाडू जसे की सोहेल तनवीर, इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद इम्रान खान यांचाही समावेश करण्यात आला होता. याशिवाय भारताचे माजी खेळाडू राहुल शर्मा, गुरकीरत सिंग मान आणि अभिमन्यू मिथुन यांचे नावदेखील या संघात जोडले गेले होते. पाकिस्तानी खेळाडूंसह एकाच संघात धवनचे नाव झळकताच क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. कारण यापूर्वी 2025 मधील 'ऑपरेशन सिंदूर' आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शिखर धवनने पाकिस्तानविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेत जाहीर टीका केली होती. त्यामुळे त्याच्या सहभागाबद्दल चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते.

शिखर धवनची सोशल मीडिया पोस्ट

या प्रकारानंतर एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत धवनने लिहिले, "वर्ल्ड टी-20 कॉन्टिनेंट कपमध्ये सहभागी म्हणून माझे नाव असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. आयोजकांनी माझ्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय माझे नाव वापरले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी माझी टीम योग्य ती कायदेशीर कारवाई करेल." तसेच कोणत्याही अनधिकृत घोषणांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती त्याने आपल्या चाहत्यांना केली आहे. धवनच्या या स्पष्टीकरणामुळे या स्पर्धेतील त्याच्या सहभागाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, आयोजकांच्या मनमानी कारभाराविरोधात कायदेशीर लढा देण्याची तयारी त्याच्या संघाने केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >