
Nashik Crime : नाशिकमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. आरोपी नोमाण अन्सारी या तरुणाने या चिमुकलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत.
या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला मालेगाव येथून बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी नोमाण अन्सारी याने 13 वर्षीय अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण केले. एवढ्यावरच न थांबता त्याने धर्मांतर करण्यासाठी तिला जबरदस्तीने हिजाब (Hijab) घालायला लावून नमाज पठण करायला लावले. संतापजनक म्हणजे या सर्व प्रकारांचे आणि लैंगिक शोषणाचे फोटो व व्हिडीओ आरोपीने स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केले होते. हे आक्षेपार्ह फोटो आणि नमाज पठणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी नोमाण हा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला देत होता.
...तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल
आरोपानुसार, आरोपीची अरेरावी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याने पीडित मुलीच्या कुटुंबालाही थेट धमकी दिली. "तुमच्या मुलीशी लग्न करून तिला दिल्लीला घेऊन जाईन आणि तिचे धर्मांतर करेन. जर तुम्ही विरोध केला, तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल, अन्यथा सर्व फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करेन," अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. उपनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ कारवाई करत आरोपी नोमाण अन्सारी याला मालेगाव (Malegaon) येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीचा आणि पीडित मुलीचा मोबाईल जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.





