Nashik News : आहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे दाखल असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या आणि एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य संशयिताला नाशिकरोड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सुनील बाबासाहेब शिरसाठ (वय २६, रा. मोहज बुद्रुक, ता. पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अटकेच्या कारवाईदरम्यान त्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारण्याची धमकी दिल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांना पाहताच उडी मारण्याची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शिरसाठ याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२६ रोजी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो गेल्या दीड महिन्यापासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच तो नाशिकरोड परिसरात लपून बसल्याची माहिती नाशिक शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना मिळाली.या माहितीच्या आधारे त्यांनी नाशिकरोड गुन्हे शाखेचे प्रभारी संदीप पवार यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेतली.
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील टपाल सेवांचे प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने स्वतंत्र ‘नाशिक टपाल क्षेत्रा’च्या ...
रुद्र हाईट्स इमारतीत थरार
पोलीस पथक नाशिकरोड येथील रुद्र हाईट्स इमारतीत पोहोचले असता, संशयिताने फ्लॅट क्रमांक पाचच्या गॅलरीत जाऊन पोलिसांनी जवळ येण्याचा प्रयत्न केल्यास खाली उडी मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांसमोर त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्याचे आव्हान निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नाशिकरोड अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी संयम राखत परिस्थिती हाताळली. शिडीच्या मदतीने आणि नियोजनपूर्वक गॅलरीत प्रवेश करून संशयिताला कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले.
एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
सुनील शिरसाठ याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ३१६(५), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण (एमपीआयडी) कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. अटकेनंतर संशयिताला पुढील तपासासाठी आहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या आर्थिक फसवणूक प्रकरणात पुढील तपास सुरू असून, त्यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.