
पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २० विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लेडी रीडिंग रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश
या दुर्घटनेनंतर सुरुवातीला १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, नंतर मृतांचा आकडा वाढून २१ वर पोहोचला. मृतांमध्ये एका शिक्षिकेचाही समावेश आहे. मृत विद्यार्थी साधारणतः १३ वर्षे वयोगटातील असल्याचे वृत्त असून, काही विद्यार्थी त्यापेक्षाही लहान होते. दुर्घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. आपल्या मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच पालकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वर्ग सुरू असताना अचानक प्रचंड आवाजासह शाळेची संपूर्ण छत विद्यार्थ्यांवर कोसळली. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांचा आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी कटर आणि आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने प्रयत्न करत आहेत. ढिगाऱ्याखालून वाचवण्यात आलेल्या मुलांना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने नजीकच्या रुग्णालयांत हलवण्यात येत आहे.
मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि कुटुंबाकडून न स्वीकारणे अशा समस्यांना ...
पाकिस्तानमध्ये इमारती कोसळण्याच्या घटनांत वाढ
पाकिस्तानमध्ये इमारतींची सुरक्षितता आणि बांधकामांच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट बांधकाम साहित्य, सुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि अपुऱ्या देखभालीमुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही पाकिस्तानमध्ये शाळांच्या इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात उमरकोट येथे सरकारी प्राथमिक शाळेची भिंत कोसळून तीन ते १३ वर्षे वयोगटातील तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्याच महिन्यात लाहोरमधील बागबानपुरा परिसरात एका खासगी शाळेच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळले होते. या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला, तर किमान पाच जण जखमी झाले होते.
यापूर्वीही शाळांच्या इमारती कोसळून विद्यार्थ्यांचा मृत्यू
पाकिस्तानमधील वृत्तानुसार, जून महिन्यात लाहोरमधील कहाना परिसरात एका खासगी शिकवणी वर्गाचे छत कोसळून १४ मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डेरा गाजी खान येथील एका खासगी शाळेच्या वर्गखोलीचे छत कोसळल्याने चार मुलांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीत शिकवणी केंद्राच्या इमारतीचा विस्तार सुरू असताना वर्गखोलीचे छत कोसळल्याचे समोर आले होते. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






