Saturday, October 17, 2026

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील शेवटचा टी20 सामना होणार आहे. हा सामना निर्णायक असणार आहे. असं असताना या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. चौथ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला चौथ्या टी20 सामन्यातील शेवटचे चेंडू खेळता आले नाही. तसेच रिटायर्ड आऊट होत तंबूत परतावं लागलं होतं. त्यामुळे पाचव्या टी20 सामन्यात खेळणार की नाही? हा प्रश्न होता. आता पाचव्या टी20 सामन्यात खेळणार नाही हे निश्चित झालं आहे. भारतीय संघात त्याची जागा आता वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार घेणार आहे. गेल्या चार वर्षांपासून टीम इंडिया बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. खरं तर त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत निवड झाली होती. पण त्या आधीच त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. बीसीसीआये या बाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयने या बदलाबाबत काय सांगितलं?

बीसीसीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलं की, पुरुष निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारचा भारतीय संघात समावेश केला आहे. सध्या सुरू असलेल्या टी20 मालिकेचा अंतिम सामना 17 ऑक्टोबर 2026 रोजी बंगळूरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. बुधवारी हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या टी20 सामन्यादरम्यान अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या समावेशामुळे संघाचे गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत होईल.

पाच सामन्यातील टी20 मालिकेतील चार सामन्यांचा खेळ झाला असून 2-2 अशी स्थिती आहे. त्यामुळे पाचवा टी20 सामना निर्णायक असणार आहे. आता स्विंगचा किंग असलेला भुवनेश्वर कुमार संघात आल्याने संघाची ताकद वाढणार आहे. आता प्लेइंग 11 चा भाग असेल की नाही हे सांगणं कठीण आहे. पण संधी मिळाली तर वेस्ट इंडिजला त्याचा आक्रमणाचा सामना करणं कठीण जाऊ शकतं.

भारताचा अद्ययावत टी20 संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >